ठळक मुद्दे एका चित्रपटाचे कॅमेरामन प्रकाश शिंदे नावाचे गृहस्थ होते. त्यांच्यासोबत नेहमीच त्यांची मुलगी सेटवर यायची. तिने मला अशोक मामा बोलायला सुरुवात केली आणि तिथून माझे नाव अशोक मामा असेच पडले.

अशोक सराफ यांचा आज म्हणजेच ४ जूनला वाढदिवस असून त्यांनी केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. आयत्या घरात घरोबा, एक डाव भुताचा, अशी ही बनवाबनवी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. हम पाच या मालिकेत त्यांनी साकारलेला आनंद माथुर तर आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. अशोक सराफ यांनी करण अर्जुन, यस बॉस यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या.

अशोक सराफ यांना मराठी चित्रपटसृष्टीत सगळे अशोक मामा या नावानेच ओळखतात. अशोक सराफ यांना सगळे मामा या नावानेच हाक का मारतात याविषयीचा एक रंजक किस्सा आहे. अशोक सराफ यांना पूर्वी मराठी चित्रपटसृष्टीतील सगळे अशोक याच नावाने हाक मारायचे. पण अशोक सराफ यांना नंतरच्या काळात सगळेच अशोक मामा याच नावाने हाक मारायला लागले. 

अशोक सराफ यांनीच एका मुलाखतीत याविषयी खुलासा केला होता. त्यांनी सांगितले होते की, काही वर्षांपूर्वी एका चित्रपटाच्या सेटवर घडलेल्या घटनेमुळे सगळे मला मामा अशी हाक मारायला लागले. एका चित्रपटाचे कॅमेरामन प्रकाश शिंदे नावाचे गृहस्थ होते. त्यांच्यासोबत नेहमीच त्यांची मुलगी सेटवर यायची. तिने मला अशोक मामा बोलायला सुरुवात केली आणि तिथून माझे नाव अशोक मामा असेच पडले.


 
अशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात मराठी नाटकापासून केली आणि पुढे त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये काम केले. त्यांचे काम प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी तर फार प्रसिद्ध होती. या दोघांची जोडी म्हणजे मनोरंजनाचा डबल धमाकाच असायचा. असा हा डबल धमाका निदान अजून तरी कोणी देऊ शकलेले नाही. विनोदी सिनेमे म्हटले की आपसुकच अशोक सराफ डोळ्यांसमोर येतात. आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ते मराठी सुपरस्टार आहेत. अशोक सराफ यांनी विनोदी तसेच गंभीर भूमिका पण साकारल्या आहेत.

Web Title: Ashok Saraf Birthday Special: This is a reason why everyone called Ashok Saraf As Ashok mama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.