‘अॅन एक्स्ट्राऑर्डिनरी जर्नी ऑफ अ फकीर’ मध्ये दिसलेली अमृता संत आता बाटला हाऊस या आगामी चित्रपटात  महिला कार्यकर्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या या नव्या पात्राविषयी अधिक माहिती देताना ती म्हणाली, पोलीस, सरकार आणि एकूण यंत्रणेविरुद्ध उभ्या ठाकलेल्या कार्यकर्त्याची भूमिका मी या चित्रपटात वठवणार आहे. हे खूपच मजबूत पात्र आहे. लोकांना अन्यायाविरुद्ध जागरुक करून सरकार आणि पोलिस यंत्रणेविरुद्ध ही महिला कार्यकर्ती ठामपणे लढा देत आहे.


या प्रकल्पावर काम करतानाच्या तिच्या अनुभवाबद्दल सांगताना अमृता सांगते, ‘व्यावसायिक आणि गुणी कलाकारांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल मी स्वतःला नशीबवान समजते. निखील अडवाणींसारख्या दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी मिळाल्याचा मला खूप आनंद होत आहे. सेटवर प्रत्येक कलाकाराला कम्फर्टेबल वाटेल, याची काळजी त्यांनी घेतली आहे. ते अतिशय खुल्या मनाचे दिग्दर्शक असून नवीन कल्पना ऐकायला ते कायमच उत्सुक असतात. या नव्या कल्पना जर चित्रपटासाठी सुयोग्य असल्या तर, कलाकार आणि एकूणच संचातील सुधारणांसाठीही ते आनंदाने प्रयत्न करतात. मला वाटते की त्यांच्या याच स्वभावामुळे सेटवर एकत्रितपणा येण्यासाठी मदत होते.’

 


जॉन अब्राहम आणि मृणाल ठाकूरसारख्या सहकलाकारांसोबत काम करण्याबाबत अमृता म्हणते, ‘जॉन तर सुपरस्टार आहे. हा चित्रपट करेपर्यंत मी त्याला व्यक्तिशः ओळखत नव्हते. तो अगदी शांत, नम्र आणि चांगला माणूस आहे. मृणालदेखील खूप चांगली आहे आणि मदतीला कायम तत्पर असते. या दोघांसोबत काम करण्याचा अनुभव फारच छान होता.’

सुनिल शानबाग, मकरंद देशपांडे आणि दिव्या जगदाळे यांसारख्या दिग्गज लोकांसोबत रंगभूमी गाजवलेल्या अमृत संत हिला नागेश भोसले दिग्दर्शित ‘पन्हाळा’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला आहे.


Web Title: Amrita Sant will be seen in a special role in the movie 'Batla House'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.