अजितदादांनी गुप्त भेटी घेऊन मला १० वेळा निरोप का पाठवला?; अमोल कोल्हेंचा खळबळजनक गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 04:07 PM2024-03-04T16:07:47+5:302024-03-04T16:10:19+5:30

अजित पवार यांनी केलेल्या टीकेला आता अमोल कोल्हे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं असून मी त्यांच्या पक्षात यावं यासाठी अजित पवारांनी माझी गुप्त भेट घेतली, असा गौप्यस्फोट केला आहे.

Why did Ajit pawar message me 10 times with secret visits Amol Kolhe reply | अजितदादांनी गुप्त भेटी घेऊन मला १० वेळा निरोप का पाठवला?; अमोल कोल्हेंचा खळबळजनक गौप्यस्फोट

अजितदादांनी गुप्त भेटी घेऊन मला १० वेळा निरोप का पाठवला?; अमोल कोल्हेंचा खळबळजनक गौप्यस्फोट

Amol kolhe Vs Ajit Pawar ( Marathi News ) : शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे उद्घाटन आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी अजित पवार यांनी या मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर काही गंभीर आरोप करत आक्रमक टीका केली. अमोल कोल्हे हे सेलिब्रिटी उमेदवार असून त्यांना उमेदवारी देऊन मी चूक केल्याचं त्यांनी म्हटलं. अजित पवार यांच्या या टीकेला आता अमोल कोल्हे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं असून मी त्यांच्या पक्षात यावं यासाठी अजित पवारांनी माझी लपून-छपून भेट घेतली आणि १०-१० वेळा निरोपही पाठवले, असा गौप्यस्फोट अमोल कोल्हे यांनी केला आहे.

"अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असणारे सुनील तटकरे हेदेखील संसद सदस्य आहेत. मात्र माझी लोकसभेतील कामगिरी त्यांच्यापेक्षा सरस आहे. मी २०१९ साली काढलेल्या शिवस्वराज्य यात्रेचं अजित पवार यांनी स्वत:च कौतुक केलं होतं. मी सेलिब्रिटी उमेदवार असेन आणि मतदारसंघात काम केलं नसेल तर अजित पवार यांनी मी त्यांच्या पक्षात यावं, यासाठी माझ्या गुप्त भेटी का घेतल्या आणि १० वेळा निरोप का पाठवले?" असा खोचक सवाल विचारत अमोल कोल्हे यांनी पलटवार केला आहे.

दरम्यान, "मला शरद पवारसाहेबांनी दिली जी संधी दिली, त्या संधीप्रती प्रामाणिक राहण्याचा मी प्रयत्न केला आहे. माझी संसदेतील जी कामगिरी आहे, ती मी लोकांसमोर ठेवली आहे. मी ठामपणे सांगतो, जी भूमिका मी घेतली, त्या भूमिकेवर मी कायम आहे आणि कायम राहणार आहे," असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांनी कोल्हे यांच्यावर टीका करताना काय म्हटलं?

अजित पवार यांनी शिरूर लोकसभेतील नागरिकांशी संवाद साधताना आज म्हटलं की, "एखादा उमेदवार आम्हाला पराभूत करता येत नसेल तर सेलिब्रिटी काढायचे. हेमा मालिनी, सनी देओल, गोविंदा, धर्मेंद्र असे अनेक कलाकार निवडणुकीत उभे राहतात. यांचा राजकारणाची काय संबंध आहे. अमिताभ बच्चन यांनाही एकदा उभे केले होते. शेवटी त्या भागातील विकासकामे करण्याची आवड आहे का हे पाहायला हवे. यात आमचीही चूक आहे. कुणाच्या डोक्यात काय चाललंय हे कळायला मार्ग नाही," असं म्हणत अमोल कोल्हे यांना उमेदवारी देऊन चूक झाल्याचं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, "खासदारकीला दोन वर्ष झाल्यानंतर अमोल कोल्हे माझ्याकडे आले, त्यांनी मला राजीनामा द्यायचा आहे असं म्हटलं. त्यावर मी बोललो, जनतेनं आपल्याला ५ वर्षासाठी निवडून दिले आणि २ वर्षात राजीनामा दिला तर लोक जोड्याने मारतील. असं करू नका. तुमची अडचण काय असं मी विचारले, तेव्हा दादा मी कलावंत आहे. माझी वेगवेगळी नाटके, सिनेमा आहेत त्यावर परिणाम होतोय असं कोल्हेंनी म्हटलं. मी कोल्हेंना म्हटलं असं करू नका. दिसायला खराब दिसते त्यावर कोल्हेंनीही उत्तर दिले, मी सेलिब्रिटी आहे. लोकांना वाटतं मी रोज मतदारसंघात यावे कसं शक्य आहे? मला माझी मालिका असते, त्याठिकाणी काम करावे लागते. मग ते कोण बघणार? माझ्या व्यवसायावर परिणाम झाला असे त्यांचे शब्द होते," असा आरोप अजित पवारांनी केला आहे.

Web Title: Why did Ajit pawar message me 10 times with secret visits Amol Kolhe reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.