महाराष्ट्र सदनातील शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण यांचे पुतळे बदलण्याच्या आश्वासनाचे काय झाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 12:08 IST2026-03-10T12:08:31+5:302026-03-10T12:08:57+5:30
सभागृहात दिलेला शब्द महायुती सरकार पाळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुतळ्यांची छायाचित्रे आल्यानंतर तीव्र नाराजी व्यक्त झाली होती.

महाराष्ट्र सदनातील शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण यांचे पुतळे बदलण्याच्या आश्वासनाचे काय झाले?
समीर देशपांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि नवमहाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी विसंगत असलेले पुतळे बदलण्याची घोषणा ५ जुलै २०२४ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती; परंतु त्यानंतर याप्रकरणी एकही कागद पुढे गेलेला नाही. सभागृहात दिलेला शब्द महायुती सरकार पाळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुतळ्यांची छायाचित्रे आल्यानंतर तीव्र नाराजी व्यक्त झाली होती.
अजित पवार यांनी हे दिले होते उत्तर
दिल्लीतील महाराष्ट्र सदनमधील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याबाबत जे काही करावे लागेल ते करण्यासाठी शासन तयार आहे. कारण हा विषय शाहू महाराजांशी संबंधित आहे. त्यांचे वंशजच आता लोकसभेला निवडून आले आहेत. त्यांचाही याबाबत विचार घेतला जाईल. गरज पडल्यास दिल्लीला जाऊन पुतळ्यांची प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घेतला जाईल.
निदर्शनांची दखल घेत वडेट्टीवार यांनी वेधले लक्ष
ज्या दिवशी बातमी प्रसिद्ध झाली, त्याच दिवशी भाजपने कोल्हापुरातील दसरा चौकामध्ये निर्दशने करून हे पुतळे बदलण्याची मागणी केली. भाजपसह जिल्हा नागरी कृती समितीनेही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे पुतळे बदलण्याची मागणी केली. दुसऱ्या दिवशी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याप्रश्नी सरकारचे लक्ष वेधले आणि त्याला तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले.
