लोकसभा निवडणूक जाहीर होताच पहिला आमदार शिंदे गटात प्रवेश करणार; उद्धव ठाकरेंना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 10:40 AM2024-03-17T10:40:19+5:302024-03-17T10:40:52+5:30

२ वेळा पक्षाने त्यांना विधानसभेची तिकीट दिली. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर २०२२ मध्ये पक्षाने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. 

Uddhav Thackeray's Vidhan Parishad MLA Amshya Padvi will join CM Eknath Shinde's Shiv Sena | लोकसभा निवडणूक जाहीर होताच पहिला आमदार शिंदे गटात प्रवेश करणार; उद्धव ठाकरेंना धक्का

लोकसभा निवडणूक जाहीर होताच पहिला आमदार शिंदे गटात प्रवेश करणार; उद्धव ठाकरेंना धक्का

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आमश्या पाडवी हे कार्यकर्त्यांसह आज मुंबईत पोहचले आहे. पाडवी हे कट्टर शिवसैनिक आणि उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र पाडवी यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे नंदूरबारमध्ये स्थानिक राजकारणावर त्याचा परिणाम होणार आहे. 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पाडवी हे सत्ताधारी शिवसेनेच्या गोटात सामील होत असल्याने त्याचा फटका महाविकास आघाडीलाही बसणार आहे. आमश्या पाडवी हे मविआकडून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक होते.  पण ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे. त्यामुळे पाडवी हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं समोर येत आहे. आदिवासी समाजातील मोठा चेहरा म्हणून आमश्या पाडवी यांच्याकडे पाहिले जाते. दुपारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आमश्या पाडवी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे. 

कोण आहेत आमश्या पाडवी?

नंदूरबारमध्ये १९९५ पासून स्थानिक राजकारणाला सुरुवात केलेले आमश्या पाडवी हे उद्धव ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. पाडवी हे दोनदा अक्कलकुवा पंचायत समितीचे सभापती होते. अक्कलकुवा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकपदही त्यांनी भुषवलं. आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आमश्या पाडवी यांनी ११ वर्ष सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आक्रमक मोर्चे, आंदोलने केली. २०१४ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हापासून ते जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. २ वेळा पक्षाने त्यांना विधानसभेची तिकीट दिली. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर २०२२ मध्ये पक्षाने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. 

मुंबईत इंडिया आघाडीचे शक्तिप्रदर्शन

दरम्यान, ६३ दिवस सुरू असलेल्या भारत जोडो न्याय यात्रेची आज मुंबईत सांगता होणार आहे. दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर इंडिया आघाडीची सभा होईल. रविवार १७ मार्च रोजी रॅलीचे आयोजन करण्यात आले असून यात इंडिया आघाडीचे सर्व दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. या रॅलीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार,काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक ज्येष्ठ नेते सहभागी होऊन देशाला एकतेचा संदेश देणार आहेत.
 

Web Title: Uddhav Thackeray's Vidhan Parishad MLA Amshya Padvi will join CM Eknath Shinde's Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.