उद्धव ठाकरेंची काँग्रेसवर कुरघोडी, सांगलीतून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 21:02 IST2024-03-21T20:33:24+5:302024-03-21T21:02:45+5:30
Lok Sabha Election 2024: आज सांगली लोकसभा मतदार संघामध्ये झालेल्या जनसंवाद मेळाव्यामधून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेना उबाठा पक्षाकडून कुस्तीपटू चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदारसंघावरून काँग्रेस (Congress) आणि शिवसेना उबाठामधील (Shiv Sena UBT) वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंची काँग्रेसवर कुरघोडी, सांगलीतून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील जागावाटपाचं घोडं अडलं आहे. त्याचवेळी सांगली लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांनी दावा केल्याने तिढा निर्माण झाला होता. सांगली हा आपला पारंपरिक मतदारसंघ असल्याने तिथून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस आग्रही असतानाच उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर कुरघोडी केली आहे. आज सांगली लोकसभा मतदार संघामध्ये झालेल्या जनसंवाद मेळाव्यामधून उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उबाठा पक्षाकडून कुस्तीपटू चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदारसंघावरून काँग्रेस आणि शिवसेना उबाठामधील वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे.
आज मिरज येथे झालेल्या सभेमध्ये उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, होय आज मी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करतो. ते शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर निवडून येऊन दिल्लीत जातील. हा मर्द तुम्हाला दिलेला आहे. हा मर्द तुमच्यासाठी लढण्यासाठी मैदानात उतरला आहे. पण याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावा लागेल, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.
ते पुढे म्हणाले की, या चंद्रहारची गदा तुम्ही आहात. चंद्रहार पाटील जेव्हा पहिल्यांदा भेटायला आले तेव्हा त्यांनी मला एक गदा भेट दिली. ती गदा मी घऱी ठेवली आहे. मात्र मी चंद्रहार यांना सांगतो की, ही समोर दिसतेय ती तुमची खरी गदा आहे. जोपर्यंत ही गदा तुमच्यासोबत आहे, तोपर्यंत तुम्ही प्रतिस्पर्ध्याची चिंता करू नका, असे उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना सांगितले.