“भाजपा हा भेकड, भ्रष्ट जनता पक्ष, नरेंद्र मोदी भाकड पक्षाचे नेते”; उद्धव ठाकरेंचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 02:05 PM2024-04-09T14:05:33+5:302024-04-09T14:10:57+5:30

Uddhav Thackeray: सूर्यग्रहण आणि अमावास्येला यांची सभा होती. असा विचित्र योग देशात पहिल्यांदाच होता, असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले.

uddhav thackeray replied bjp and pm narendra modi over criticism in rally for lok sabha election 2024 | “भाजपा हा भेकड, भ्रष्ट जनता पक्ष, नरेंद्र मोदी भाकड पक्षाचे नेते”; उद्धव ठाकरेंचा पलटवार

“भाजपा हा भेकड, भ्रष्ट जनता पक्ष, नरेंद्र मोदी भाकड पक्षाचे नेते”; उद्धव ठाकरेंचा पलटवार

Uddhav Thackeray: काश्मीरमध्ये जेव्हा काश्मिरी पंडितांची घरे जाळण्यात आली तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसच्या विरोधात उभे राहात भूमिका घेतली होती. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे असे नाही म्हणाले की, काश्मीरमध्ये आग लागली आहे तर महाराष्ट्रातील लोकांचा काय संबंध? काँग्रेससह आहे ती नकली शिवसेना आहे. मला आनंद आहे की एकनाथ शिंदेंची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जात आहेत, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाकरे गटावर घणाघाती टीका केली. 

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भात मतदान होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदर्भात दोन सभा होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने प्रचारावर भर दिला आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाकरे गटासह काँग्रेस आणि अन्य विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. या टीकेला आता उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

नरेंद्र मोदी भाकड पक्षाचे नेते

सूर्यग्रहण आणि अमावास्येला यांची सभा होती. असा विचित्र योग देशात पहिल्यांदाच होता. जे भाषण झाले ते देशाच्या पंतप्रधानांचे नव्हते. शिवसेना प्रमुख ज्यांना कमळाबाई म्हणायचे त्या पक्षाला मी भेकड, भाकड, भ्रष्ट जनता पक्ष म्हणतो. त्या भाकड किंवा भ्रष्ट जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी बोलले. निवडणूक प्रचार पंतप्रधान एका पक्षाचा करत असतील तो घटनेवर हात ठेवून घेतलेल्या शपथेचा भंग होतो. त्यामुळेच मला वाटते की, नरेंद्र मोदींचे भाषण हे भाकड जनता पक्षाच्या एका नेत्याचे होते. कारण ते अध्यक्षही नाहीत, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पलटावर केला. 

एनडीए ताकदवान आघाडी होती आता हा ठिगळांचा पक्ष झाला आहे

आम्ही उत्तर यापुढे देऊ ते कृपा करुन पंतप्रधानांना दिले आहे असे कुणी समजू नये. देशाच्या पंतप्रधानांचा अपमान आमच्याकडून होणे शक्य नाही. आमचे राजकीय विरोधक आहेत त्यात भेकड जनता पक्ष आहे. कारण शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग करुन हे देशभक्त पक्षांना सतवत आहेत. धाडी टाकत आहेत. यांच्यात ताकद नाही म्हणून यांना मी भेकड म्हटले. यांना भाकड म्हणतो कारण यांच्याकडे नेता कुणी निर्माण झालेला नाही. विचारांचा आदर्श हे देऊ शकलेले नाही. भ्रष्ट तितुका मेळवावा आणि भाजपा पक्ष वाढवावा असे त्यांचे धोरण आहे. एनडीए ताकदवान आघाडी होती आता हा ठिगळांचा पक्ष झाला आहे, अशी सडकून टीका उद्धव ठाकरेंनी केली. 

दरम्यान, महाविकास आघाडी व्यापक कशी होईल याचे आटोकाट प्रयत्न आम्ही केले. माझ्या सहकाऱ्यांना धन्यवाद देतो की एकही जागा न मागता ही ताकद उभी केली. भूमिका स्वीकारली. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत येतील असे वाटले होते. पण ते शक्य झाले नाही. प्रकाश आंबेडकर काहीही बोलले तरीही आम्ही उत्तर देणार नाही. प्रकाश आंबेडकरांनी संविधान रक्षणासाठी दिलदारी दाखवायला हवी. भविष्यात काय होते पाहू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

 

Web Title: uddhav thackeray replied bjp and pm narendra modi over criticism in rally for lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.