उदयनराजेंना साताऱ्याची उमेदवारी मिळाली? उद्या घोषणा; फडणवीसांचा निरोप घेऊन खासदार निघाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 13:28 IST2024-03-26T13:25:55+5:302024-03-26T13:28:38+5:30
Udayanraje Bhosale News: सातारा राष्ट्रवादीकडे होते. साताऱ्याची जागा सोडतो आम्हाला नाशिकची द्या अशी मागणी करण्यात आली होती. आता सातारा उदयनराजेंना सोडल्यावर नाशिक कोणाला गेले, या प्रश्नाने शिवसैनिकांची धाकधुक वाढली आहे.

उदयनराजेंना साताऱ्याची उमेदवारी मिळाली? उद्या घोषणा; फडणवीसांचा निरोप घेऊन खासदार निघाले
भाजपची महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर झाली, परंतु साताऱ्याच्या जागेवर उदयनराजे भोसलेंचे नाव जाहीर झाले नाही. यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेऊन उदयनराजे दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीची वाट पाहत थांबले होते. अखेर उदयनराजेंना साताऱ्याची उमेदवारी मिळाल्याची घोषणा विद्यमान खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांनी केली आहे.
माझ्याकडे रेल्वे, बस, सिनेमाचे तिकीट आहे पण लोकसभेचे नाही, अशा शब्दांत उदयनराजेंनी नाराजी व्यक्त केली होती. साताऱ्याची जागा राष्ट्रवादीकडे होती. यामुळे भाजपा राजेंना कोणताही शब्द देत नव्हती. तर अमित शाह यांनी देखील उदयनराजेंना आज-उद्या करत भेट टाळली होती. यामुळे राजघराण्याला दिल्लीत झुलवत ठेवल्यावरून राज्यात विरोधी पक्ष टीका करू लागले होते.
निंबाळकर हे फडणवीस यांची भेट घेऊन बाहेर पडले. तेव्हा माध्यमांना त्यांनी ही माहिती दिली. सातारा लोकसभा मतदारसंघातून छत्रपती उदयनराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. उद्या याबाबत घोषणा होण्याची शक्यता आगहे. माढ्यातून पश्चिम महाराष्ट्रातील प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. यासाठी अजित पवार, फडणवीस, शिंदे उपस्थित राहणार असल्याचे निंबाळकर म्हणाले.
दरम्यान, सातारा राष्ट्रवादीकडे होते. साताऱ्याची जागा सोडतो आम्हाला नाशिकची द्या अशी मागणी करण्यात आली होती. आता सातारा उदयनराजेंना सोडल्यावर नाशिक कोणाला गेले, या प्रश्नाने शिवसैनिकांची धाकधुक वाढली आहे. शिरवळपासून साताऱ्यापर्यंत जागोजागी उदयनराजेंच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले आहेत. यामुळे थेट दिल्लीतून साताऱ्यातही कार्यकर्त्यांना संदेश गेल्याची चर्चा रंगली आहे.