महायुतीत ठाणे, कल्याणच्या जागेवर आला नवा द्विस्ट, मुंबई, कोकणच्या जागा एकमेकांमध्ये गुंतल्याने तिढा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 13:32 IST2024-03-31T13:31:28+5:302024-03-31T13:32:23+5:30
Maharashtra Lok sabha Election 2024: महायुतीत गुंता वाढत चालला आहे. मुंबई आणि कोकणातील जागा ठरवताना भाजप आणि शिंदेसेनेत कमालीचा तणाव असल्याचे चित्र आहे. ठाणे, कल्याणच्या जागेबाबत आता नवा द्विस्ट आला आहे.

महायुतीत ठाणे, कल्याणच्या जागेवर आला नवा द्विस्ट, मुंबई, कोकणच्या जागा एकमेकांमध्ये गुंतल्याने तिढा
मुंबई - महायुतीत गुंता वाढत चालला आहे. मुंबई आणि कोकणातील जागा ठरवताना भाजप आणि शिंदेसेनेत कमालीचा तणाव असल्याचे चित्र आहे. ठाणे, कल्याणच्या जागेबाबत आता नवा द्विस्ट आला आहे. रायगडमध्ये सुनील तटकरे यांची उमेदवारी अजित पवार गटाने आधीच नक्की केली आहे. भिवंडीत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील भाजपचे उमेदवार आहेत. बाकीच्या ठाणे हा मुख्यमंत्री शिंदे यांचा गृहजिल्हा. त्यामुळेच ठाणे आणि लागून असलेली कल्याणची जागा त्यांना हवी आहे. कल्याणमधून त्यांचे पुत्र खा. श्रीकांत शिंदे हे उमेदवार असतील. मात्र, ठाण्याची जागा आपल्याकडे घ्या, असा दबाव भाजप नेत्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आणला आहे. आणखी एक नवा द्विस्ट आला आहे. ठाण्यासाठी शिंदे फारच आग्रही राहिले, तर तिथे श्रीकांत शिंदेंना लढवायला सांगा आणि कल्याणची जागा आपल्याकडे घ्या, असेही भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. तसे झाले तर कल्याणमधून सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण भाजपचे उमेदवार असतील.
पालघरच्या जागेचा पेच वेगळ्या कारणाने सुटत नाही. ही जागा भाजपने मागितली ॐ आहे. तिथले खासदार राजेंद्र गावित, हे शिदेसेनेत आहेत. गावित यांना भाजपमध्ये आणून लढवावे, असा एक प्रस्ताव भाजपकडून देण्यात आल्याचे समजते.
रत्नागिरी-सिंधुदुर्गचा विषय अधिकच ताणला गेला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना तिथे शिदेसेनेकडून लढायचे आहे; पण भाजपने कुठल्याही परिस्थितीत ही जागा आम्हाला द्या, असा आग्रह धरला असल्याची माहिती आहे. तेथे भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावाची चर्चा असली तरी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांना लढण्याचा पक्षादेश आला, तर त्यांचा नाइलाज असेल. स्वतः चव्हाण तेथून लढण्यास इच्छुक नाहीत.
महाजन, शेलार की साटम?
उत्तर-मध्य मुंबईतील उमेदवार भाजपला अद्याप ठरवता आलेला नाही. विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या उमेदवारीबाबतची अनिश्चितता कायम आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. आशिष शेलार उत्सुक नसल्याने आता आ. अमित साटम यांचे नाव पुढे आले आहे.
दक्षिण मुंबईतील भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रचारही सुरू केला होता: पण उमेदवारी जाहीर न झाल्याने तेही थंडावले आहेत. तेथे मनसेला संधी मिळणार का, याबाबत उत्सुकता आहे. उत्तर-पश्चिम मुंबईची जागा भाजपकडे, की शिंदे गटाकडे, हे ठरलेले नाही.