अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 18:07 IST2024-05-18T17:46:17+5:302024-05-18T18:07:10+5:30
शरद पवार यांनी एका मुलाखतीदरम्यान अजित पवारांबद्दल केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा होत आहे.

अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
Sharad Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवार विरुद्ध पवार संघर्षामुळे यंदाची लोकसभा निवडणूक चांगलीच गाजली. बारामतीत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना त्यांच्या भावजय आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आव्हान दिल्याने पवार कुटुंबात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमधील मतभेद आणखी तीव्र झाल्याची चर्चा रंगत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीदरम्यान अजित पवारांबद्दल केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा होत आहे.
"राजकारणापलीकडे भविष्यात अजित पवारांनी मदतीसाठी हात पुढे केला तर तुम्ही त्यांना तो हात द्याल का?" असा प्रश्न 'बीबीसी मराठी'च्या मुलाखतीत शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर पवार यांनी म्हटलं की, "असा प्रश्न येणारच नाही. कारण अजितचा स्वभाव मला माहीत आहे. तो कधी कोणासमोर हात पसरणार नाही."
"व्यक्तिगत संबंधांमध्ये कटुता येणार नाही"
पवार कुटुंबात झालेल्या राजकीय संघर्षावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, "हे घडलं नसतं तर मला आनंदच झाला असता. पण बारामतीची निवडणूक ज्यांनी पवार विरुद्ध पवार केली ती व्यक्ती यापूर्वी कधी राजकारणात किंवा समाजकारणात नव्हती. याउलट माझी मुलगी तीन वेळा लोकसभा निवडणुकीत विजयी झाली आहे. त्यापूर्वी राज्यसभेतही गेली होती आणि ती राजकारणात पूर्णवेळ काम करत आहे. त्यामुळे मतभिन्नता झाली नसती तर चांगलं झालं असतं. पण लोकशाहीत सर्वांना अधिकार आहे. उद्या एखाद्या वाटलं की ही भूमिका योग्य नाही, ती भूमिका योग्य आहे, तर ते त्यांच्या रस्त्याने जाऊ शकतात. मात्र त्यामुळे व्यक्तिगत संबंधांमध्ये कटुता येण्याचं कारण नाही," अशी भूमिका पवार यांनी मांडली आहे.
"विधानसभा निवडणूक वस्तुस्थिती स्पष्ट होईल"
शरद पवार यांनी या मुलाखतीदरम्यान त्यांच्यापासून दूर गेलेल्या पक्षाच्या सहकाऱ्यांवर निशाणा साधला आहे. "भाजपला हे हवंच होतं. याबाबत सर्वजण सांगतच होते. पण हा प्रश्न फक्त माझ्या कुटुंबाबाबत मर्यादित नाही. आम्ही सर्वांनी मिळून हा पक्ष उभा केला आणि राज्यात एक शक्तीकेंद्र तयार केलं. आमचे सगळे लोक १९९९ पासून अनेक वर्षे सत्तेत होते. त्यातून काही लोकांना मंत्रीपदं मिळालं, काहींना तर तीन-तीन वेळा उपमुख्यमंत्रिपद मिळालं. मात्र त्यांनी आता वेगळी भूमिका घेतली आणि रस्ते वेगळे झाले. आता बघूयात पुढे काय होतं. खरी निवडणूक भविष्यात विधानसभेची आहे. विधानसभा निवडणुकीत वस्तुस्थिती स्पष्ट होईल, आज त्यावर भाष्य करण्याची आवश्यकता नाही," असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.