अवघ्या एका मताने फैसला, ठाकरेंच्या उमेदवाराने भाजपाला दिली मात, येथे झाली रोमांचक लढत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 15:22 IST2026-01-18T15:21:53+5:302026-01-18T15:22:48+5:30
Parbhani Municipal Corporation Election Result: परभणी महानरपालिकेमध्ये उद्धवसेना आणि भाजपाच्या उमेदवारांमध्ये अत्यंत रोमांचक सामना झाला आणि या सामन्यामध्ये उद्धवसेनेच्या उमेदवाराने अवघ्या एका मताने भाजपाच्या उमेदवाराला मात दिली.

अवघ्या एका मताने फैसला, ठाकरेंच्या उमेदवाराने भाजपाला दिली मात, येथे झाली रोमांचक लढत
नुकत्याच झालेल्या राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी अगदी अटीतटीच्या लढती झाल्या. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये अवघ्या काही मतांनी जय पराजयाचा फैसला झाला. त्यात परभणी महानरपालिकेमध्ये उद्धवसेना आणि भाजपाच्या उमेदवारांमध्ये अत्यंत रोमांचक सामना झाला आणि या सामन्यामध्ये उद्धवसेनेच्या उमेदवाराने अवघ्या एका मताने भाजपाच्या उमेदवाराला मात दिली.निवडणूक आली की आपल्या एका मताने काय फरक पडणार आहे? असा विचार करून बरेच जण मतदान करणं टाळतात. मात्र या निकालामुळे अवघ्या एका मताची काय किंमत असते हे दिसून आले आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार परभणी महानरपालिकेमधील प्रभाग क्रमांक एकमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या जागा क्रमांक अ साठी उद्धवसेनेचे उमेदवार डहाळे व्यंकट लक्ष्मणराव, भाजपाचे प्रसाद केशवराव नागरे आणि शिंदेसेनेचे मोहन शाळिग्राम सोनवणे यांच्यात लढत झाली. या लढतीत उद्धवसेनेच्या व्यंकट लक्ष्मणराव डहाळे यांना ४ हजार ३१२ मते मिळाली, तर भाजपाचे प्रसाद केशवराव नागरे यांना ४ हजार ३११ मते मिळाली, अशा प्रकारे उद्धवसेनेचे व्यंकट लक्ष्मणराव डहाळे केवळ एका मताने विजयी झाले. या लढतीमध्ये शिंदेसेनेचे मोहन शाळिग्राम सोनवणे यांना १३६५ मते मिळाली.
महानगपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून परभणी महानरपालिकेमधील प्रभाग क्रमांक एकमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या जागा क्रमांक अ वर झालेल्या या रोमांचक लढतीचं निकाल पत्रक व्हायरल होत आहे. तसेच एका मताचं काय महत्त्व असंत हे या निकालामधून दिसत आहे, अशी प्रतिक्रिया लोक त्यावर व्यक्त करत आहेत.
दरम्यान, परभणी महानगपालिकेमध्ये उद्धवसेना २५ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसला १२ जागा मिळाल्या आहेत. भाजपालाही १२ जागांवर यश आलं असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला ११ जागा मिळाल्या आहेत. अपक्ष आणि इतरांना ५ जागंवर यश मिळालं आहे.