"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 10:16 IST2025-12-26T10:15:27+5:302025-12-26T10:16:27+5:30
"हे आमचे जे गेले वीर ते गुलाल उधळत नाचत होते आणि नाचता नाचता तिकडे गेले आणि त्यांनी घेतले. निर्लज्ज नक्की कोणाला म्हणायचं? यांना म्हणायचं की घेणाऱ्यांना म्हणायचं?"

"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा
नाशिक - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजपाने उद्धवसेना, मनसे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), यांना जोरदार धक्का दिला. विरोधी पक्षातील २ माजी महापौरांसह अनेक मोठ्या नेत्यांनी भाजपत प्रवेश केला. यांत विनायक पांडे, यतीन वाघ, दिनकर पाटील आदी नेत्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, बुधवारी ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर, शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जोरदार जल्लोष केला होता. या जल्लोषात दिनकर पाटीलही उपस्थित होते. मात्र, ठाकरेबंधूंच्या युतीला २४ तासही उलटत नाहीत, तोच दिनकर पाटील भाजपा डेरेदाखल झाले. या संपूर्ण प्रकरणावर संजय राऊत यांनी भाष्य करत भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या या नेत्यांवर आणि भाजपावरही जोरदार निशाणा सांदला आहे. ते मुंबईत पत्रकारांसोबत बोलत होते.
'हे' या महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासणारं कृत्य आहे -
या पक्षप्रवेशासंदर्भात बोलताना राऊत म्हणाले, "जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून जे गेले किंवा आमच्याकडून जे गेले ते भटकेच आहेत. कधी एखाद्या पक्षात ते स्थिर राहिले आणि जिथे राहिले तिथे त्या स्थिरतेने काम केलं असं आम्हाला कधी दिसलं नाही. तरी ते आमच्या पक्षात होते. गिरीश महाजन हे स्वतःला बाहुबली समजतात पण नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांच्या भागात त्यांना फार मोठा फटका बसलाय. त्यांची पत्नी बिनविरोध निवडून आणली असेल पण उत्तर महाराष्ट्रामध्ये त्यांना फार मोठं यश याच कारणामुळे मिळू शकलं नाही. भारतीय जनता पक्ष हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे असा दावा ते करतात. भारतीय जनता पक्षाकडे देशात सर्वाधिक संपत्ती आणि साधारण दहा हजार कोटीचा निधी आहे. गौतम अदानीसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सदस्य आहे, बरोबर ना? तरीही त्यांना इतर पक्षांचे खासदार, आमदार, नगरसेवक आणि कार्यकर्ते फोडावे लागतात. हे श्रीमंत भिकाऱ्याचं लक्षण आहे. जेव्हा श्रीमंत जेव्हा भिकारी होतो तेव्हा तो अत्यंत लाचार आणि लोचटपणे वागतो. आज गिरीश महाजन यांच्या चेहऱ्यावरचा लोचटपणा बघितला. त्यांच्या पक्षातून विरोध होतो या लोकांना घ्यायला, लोक रस्त्यावर उतरलेत, त्यांचे. देव आणि फरांदे आमदार आहेत त्या रस्त्यावर उतरल्या, त्याच्या आधी सीमाहिरे रस्त्यावर उतरल्या होत्या. तरीही कुणालाही न जुमानता हे लोक इतर पक्षातल्या कार्यकर्त्यांना फोडून विकत घेतात. हे या महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासणारं कृत्य आहे."
देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी हे राजकीय चारित्र्याच्या गप्पा मारतात ना? मग नाशिकमध्ये तुम्ही कालर्यंत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, गुंडगिरीचे, अंडरवर्ल्डचे आरोप करत होतात, हे सगळे तुमच्या पक्षातच कसे? बलात्कारी, खुनी, कसं काय? की गिरीश महाजनना एखादी नवीन गँग तयार करायची आहे? असा सवालही राऊत यांनी यावेळी केला.
"निर्लज्ज नक्की कोणाला म्हणायचं?" -
बुधवारी संध्याकाळपर्यंत या दोन्ही पक्षातले नेते ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल एकमेकांना पेढे, लाडू भरवत होते? असे विचारले असता, राऊत म्हणाले, "दिनकर पाटील लाडू वाटत होते, लाडू भरवत होते. हे आमचे जे गेले वीर ते गुलाल उधळत नाचत होते आणि नाचता नाचता तिकडे गेले आणि त्यांनी घेतले. निर्लज्ज नक्की कोणाला म्हणायचं? यांना म्हणायचं की घेणाऱ्यांना म्हणायचं?
भाजपला बोचरा टोला -
ते असं म्हणतात की विकासासाठी आम्ही जात आहोत, आमची कोणावर नाराजी नाही? असे विचारले असता राऊत म्हणाले, "हो, फक्त भारतीय जनता पक्षच... आता ट्रम्प पण जाणार यांच्या पक्षात (भाजपा) अमेरिकेचा विकास करायचा आहे. ट्रम्प जाणार आहेत. फ्रान्सचा अध्यक्ष मॅक्रॉन जाणार आहे कारण फ्रान्सचाही विकास झालेला नाही ना आणि अमेरिकेचा विकास झालेला नाही. त्यामुळे ट्रम्प आणि मॅक्रॉनलासुद्धा ते त्यांच्या पक्षात घेतील," असा बोचरा टोलाही राऊत यांनी यावेली भाजपला लगावला.
हे नेते गेले भाजपात गेले? -
नाशिकमध्ये उद्धवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे, मनसेचे पहिले महापौर आणि सध्या उद्धवसेनेत असलेले यतीन वाघ, मनसेचे माजी आमदार आणि सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटात असलेले नितीन भोसले, उद्धवसेनेचे संजय चव्हाण, काँग्रसचे ज्येष्ठ नेते आणि स्थायी समितीचे माजी सभापती शाहु खैरे, मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला.