विधानसभा नाही, लोकसभेवेळच्या एकमेकांवरील परोपकारावरून ठाकरे-काँग्रेसचे जागावाटप अडले? नेमके काय घडले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 15:41 IST2024-10-21T15:28:02+5:302024-10-21T15:41:25+5:30
Congress-UBT Shiv sena Seat Sharing issue: काँग्रेस विदर्भात ठाकरे गटाला एकही जागा देण्यास तयार नाहीय. नाना पटोलेंचा शिवसेनेला जागा सोडण्यास विरोध आहे. शिवसेनेने विदर्भात तीन जागा मागितल्या आहेत.

विधानसभा नाही, लोकसभेवेळच्या एकमेकांवरील परोपकारावरून ठाकरे-काँग्रेसचे जागावाटप अडले? नेमके काय घडले...
महायुतीतून भाजपाची पहिली यादी आली तरी लोकसभेला आघाडी घेणाऱ्या मविआमध्ये जागावाटपावरून वाद इरेला पेटला आहे. एवढा की उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतील अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. अशातच काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत रंगलेला विदर्भातील जागांचा वाद हा विधानसभेचा नाही तर लोकसभेला एकमेकांवर केलेल्या उपकारांमुळे रंगला असल्याचे वृत्त येत आहे.
काँग्रेसशी बिनसल्याने उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस आणि राऊतांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली होती. ती अफवा असल्याचे शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने एबीपी माझाला स्पष्ट केले आहे. तसेच या नेत्याने काँग्रेस आणि शिवसेनेत जागांवरून रंगलेल्या वादाचे कारणही सांगितले आहे.
काँग्रेस विदर्भात ठाकरे गटाला एकही जागा देण्यास तयार नाहीय. नाना पटोलेंचा शिवसेनेला जागा सोडण्यास विरोध आहे. शिवसेनेने विदर्भात तीन जागा मागितल्या आहेत. आम्हालाही पक्ष वाढविण्यासाठी विदर्भात संधी मिळायला हवी अशी मागणी ठाकरे गटाची आहे. परंतू काँग्रेसच्या नेहमी लढविल्या जाणाऱ्या जागा सोडण्यास पटोले तयार नाहीत.
ठाकरे गटाने लोकसभेला काँग्रेसला दोन जागा सोडल्या होत्या. रामटेकची सहा वेळा खासदार निवडून येत असलेली जागा काँग्रेसला सोडली, अमरावतीची सोडली. आता आम्हाला विधानसभेला तीन जागा सोडा, असा युक्तीवाद शिवसेनेने केला आहे, असे या वरिष्ठ नेत्याने म्हटले आहे. तर याला विरोध करत आम्ही लोकसभेला शिवसेनेला जास्त जागा दिल्या, यामुळे आता त्यांनी आम्हाला जास्त जागा द्याव्यात, असा युक्तीवाद काँग्रेसकडून केला जात आहे.
लोकसभेला केलेले साटेलोटे विधानसभेच्या जागावाटपाआड आल्याने काँग्रेस आणि शिवसेनेतील जागांचा तिढा वाढला आहे. उद्धव ठाकरे स्वबळावर उतरतील अशी चर्चा सुरु झाली आहे. यावर आम्ही आघाडीतच राहणार, स्वबळाचा विचार नाही, असा दावाही या नेत्याने केला आहे.