“PM मोदी २० तास काम करतात, परदेशातून आले तरी आराम करत नाहीत”; अजित पवारांची स्तुतिसुमने

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 11:42 PM2024-04-21T23:42:00+5:302024-04-21T23:42:14+5:30

NCP DCM Ajit Pawar News: नवनीत राणांच्या प्रचारासाठी गेलेल्या अजित पवारांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने घेतलेल्या एका भूमिकेवरून शरद पवारांवर टीका केली.

ncp dcm ajit pawar praised pm modi and criticized sharad pawar in campaigning rally of navneet rana for lok sabha election 2024 | “PM मोदी २० तास काम करतात, परदेशातून आले तरी आराम करत नाहीत”; अजित पवारांची स्तुतिसुमने

“PM मोदी २० तास काम करतात, परदेशातून आले तरी आराम करत नाहीत”; अजित पवारांची स्तुतिसुमने

NCP DCM Ajit Pawar News:महायुतीतील घटक पक्ष आणि नेते यांच्याकडून प्रचाराचा धडका सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीतील भाजपाकडून अमरावती येथे नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका सभेला संबोधित केले. यावेळी एक गौप्यस्फोट करतानाच अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. अजित पवारही पडद्यामागे काय हालचाली सुरू होत्या, याबाबत गोप्यस्फोट करत आहेत. तर शरद पवार त्यावर पलटवार करत अजित पवारांवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत पुन्हा एकदा अजित पवारांनी २०१४ च्या निवडणुकांवेळी घडलेल्या घडामोडींबाबत भाष्य केले.

केवळ आदेश यायचे, आम्ही फक्त अंमलबजावणी करत होतो

विकासाच्या मागे जाणारा कार्यकर्ता असल्यामुळे काही निर्णय घेतले. अनेकदा आमच्या सहकाऱ्यांना सांगितले, काही वेळा आमच्या वडिलधाऱ्यांनाही सांगितले होते. अनेकांना माहिती नसेल की, २०१४ मध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण निकाल यायच्या आधीच भारतीय जनता पार्टीला विधानसभेत बाहेरून पाठिंबा दिला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर आम्हाला सांगण्यात आले की, काही दिवसांनी आपल्याला त्या सरकारमध्ये जायचे आहे. परंतु, कुठे काय खटकले माहिती नाही. तेव्हा वरून केवळ आदेश यायचे आणि आम्ही फक्त त्या आदेशांची अंमलबजावणी करत होतो, असे अजित पवार यांनी सांगितले.

दरम्यान, पहाटे पाच वाजता उठून सहा वाजता कामाला लागायची माझी जुनी सवय आहे. माझ्या मतदारसंघात ६ वाजल्यापासून कामाला सुरुवात करतो. तेच सातत्य आजपर्यंत टिकवले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील दिवसाच्या २४ तासामधील १८ ते २० तास काम करतात. परदेशातून आले तरी आराम न करता कामाला लागतात, या शब्दांत अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबाबत कौतुकोद्गार काढले.
 

Web Title: ncp dcm ajit pawar praised pm modi and criticized sharad pawar in campaigning rally of navneet rana for lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.