महायुतीतील तिढा सुटण्याच्या मार्गावर, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजपकडे, नाशकात रस्सीखेच, ठाण्यात ट्विस्ट

By यदू जोशी | Published: April 6, 2024 07:13 AM2024-04-06T07:13:48+5:302024-04-06T07:15:34+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: महायुतीत सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग  हे मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. पालघर, कल्याण आणि औरंगाबाद या जागा शिंदेसेनेकडे  जातील.  नाशिक अजित पवार गटाकडे जाण्याचे चिन्ह असले तरी तेथे महायुतीत रस्सीखेच सुरू आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024: On the way to break the rift in the Mahayuti, Satara, Ratnagiri-Sindhudurg to BJP, tug of war in Nashak, twist in Thane | महायुतीतील तिढा सुटण्याच्या मार्गावर, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजपकडे, नाशकात रस्सीखेच, ठाण्यात ट्विस्ट

महायुतीतील तिढा सुटण्याच्या मार्गावर, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजपकडे, नाशकात रस्सीखेच, ठाण्यात ट्विस्ट

- यदु जोशी 
मुंबई - महायुतीत सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग  हे मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. पालघर, कल्याण आणि औरंगाबाद या जागा शिंदेसेनेकडे  जातील.  नाशिक अजित पवार गटाकडे जाण्याचे चिन्ह असले तरी तेथे महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. ठाणे आम्हालाच हवे, असा प्रचंड आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धरला आहे. दहाएक जागांवर असलेला महायुतीचा तिढा आता दोन-तीन जागांवर आला आहे. 

कोकणच्या पट्ट्यात भाजपकडे भिवंडी आधीपासूनच आहे. त्यात रत्नागिरी-सिंधुदुर्गची भर पडेल.  शिंदेसेनेकडे कोकणात कल्याण, पालघरबरोबर ठाणे राहू शकते. ठाण्यासाठी शिंदेंनी सुचविलेले उमेदवारांचे पर्याय भाजपला मान्य नाहीत. शिंदेंनी प्रताप सरनाईक यांना लढविल्यास भाजप राजी असल्याचे सूत्रांनी सांगितले. सरनाईक तेवढे इच्छुक नाहीत. त्यावर भाजपचे संजीव नाईक यांनी शिंदेसेनेकडून लढावे, असा प्रस्तावही विचाराधीन आहे. 

- साताराची जागा अजित पवार गटाला मिळणार नाही, ही जागा भाजपकडे जाईल आणि तिथे उदयनराजे भोसले उमेदवार असतील, असे भाजपच्या गोटातून समजले. 
- नाशिकची जागा छगन भुजबळांसाठी आम्हाला द्या, यासाठी अजित पवार गट अडून बसला आहे. विद्यमान खासदार शिंदेसेनेचे हेमंत गोडसे यांनी ही जागा आम्हालाच मिळणार असे ठामपणे सांगितले आहे. दोन्ही गटांत खूपच ताणले गेले तर ही जागा आम्हाला द्या, असे ऐनवेळी भाजप म्हणू शकते. भाजपकडून आ. सीमा हिरे किंवा आ. राहुल ढिकले यापैकी एकाचा विचार होऊ शकतो. 
- उत्तर-पश्चिम मुंबईची जागा शिंदेसेनेला मिळू शकते. 
- रत्नागिरी-सिंधुदुर्गात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपची उमेदवारी मिळेल. 
- कल्याणमध्ये डॉ. श्रीकांत शिंदे तर पालघरमध्ये राजेंद्र गावित हे विद्यमान खासदार शिंदेसेनेकडून लढणार हेही जवळपास निश्चित आहे. 
- औरंगाबाद शिंदेसेनेकडे गेले असून रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे हेच उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले आहे. 

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: On the way to break the rift in the Mahayuti, Satara, Ratnagiri-Sindhudurg to BJP, tug of war in Nashak, twist in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.