Maharashtra Budget 2025: मुंबई, पुणे अन् नागपूरला अर्थसंकल्पातून गिफ्ट; अजित पवारांनी घोषणांचा पाऊस पाडला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 14:47 IST2025-03-10T14:46:14+5:302025-03-10T14:47:06+5:30

Maharashtra Budget 2025 Latest Updates: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील  खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे असं अजित पवारांनी सांगितले. 

Maharashtra Budget 2025: Gift to Mumbai, Pune and Nagpur from the budget; Ajit Pawar made a shower of announcements | Maharashtra Budget 2025: मुंबई, पुणे अन् नागपूरला अर्थसंकल्पातून गिफ्ट; अजित पवारांनी घोषणांचा पाऊस पाडला 

Maharashtra Budget 2025: मुंबई, पुणे अन् नागपूरला अर्थसंकल्पातून गिफ्ट; अजित पवारांनी घोषणांचा पाऊस पाडला 

Ajit Pawar Speech: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२५-२६ चा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या महानगरांसाठी महायुती सरकारने घोषणांचा पाऊस पाडला आहे. या शहरात सुरू असणाऱ्या विविध प्रकल्पांसाठी अर्थखात्याने निधीची तरतूद करत या प्रकल्पांना गती देण्याचं काम केले आहे. 

अजित पवारांनी अर्थसंकल्पात सांगितले की, मुंबई, नागपूर, पुणे महानगरांतील नागरिकांना पर्यावरणपूरक, शाश्वत, विनाअडथळा व वातानुकुलित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकूण १४३.५७ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू करण्यात आलेत. या सेवेचा लाभ सुमारे १० लाख प्रवासी रोज घेत आहेत. येत्या वर्षात मुंबईमध्ये ४१.२ किलोमीटर, तर पुण्यामध्ये २३.२ किलोमीटर असे एकूण ६४.४ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होणार आहेत. पुढील ५ वर्षांत एकूण २३७.५ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित होतील. नागपूर मेट्रोचा ४० किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यात ६ हजार ७०८ कोटी रुपये किंमतीचे ४३.८० किलोमीटर लांबीचे काम प्रगतीपथावर आहे. ठाणे वर्तुळाकार मेट्रो मार्ग तसेच पुण्यातील स्वारगेट ते कात्रज विस्तार मार्गिका प्रकल्पास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. पुणे मेट्रो रेल्वे टप्पा-२ अंतर्गत खडकवासला - स्वारगेट - हडपसर - खराडी आणि नळ स्टॉप - वारजे - माणिकबाग  या दोन मार्गिकांचा ९ हजार ८९७ कोटी रुपये किंमतीचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठविला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय नवी मुंबईतील उलवे येथे १ हजार १६० हेक्टर क्षेत्रामध्ये नव्याने विकसित होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची दरवर्षी ९० दशलक्ष प्रवासी आणि २.६ दशलक्ष टन माल वाहतुकीची क्षमता असणार आहे. या प्रकल्पाचे सुमारे  ८५ टक्के काम पूर्ण झाले असून चाचणी उड्डाणेही यशस्वीरीत्या पार पडली आहेत. याठिकाणाहून एप्रिल २०२५ मध्ये देशांतर्गत विमानसेवा सुरु करण्याचं नियोजन असल्याची घोषणा अजित पवारांनी अर्थसंकल्पात केली. 

दरम्यान मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील  खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन या दोन्हीत बचत होईल आणि वाहतूक कोंडीतूनही सुटका होईल. ठाणे ते नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ असा उन्नत मार्ग बांधण्याचे नियोजन असून त्याद्वारे ठाणे, डोंबिवली, कल्याण व अन्य महत्वाची मोठी शहरे आंतरराष्ट्रीय विमानतळाशी सुलभरित्या जोडली जातील. बाळकुम ते गायमुख या ठाणे किनारी मार्गाची लांबी १३.४५ किलोमीटर असून त्याचे सुमारे ३ हजार ३६४ कोटी रुपये खर्चाचे  काम २०२८ अखेर पूर्ण करणार असल्याचेही अजित पवारांनी सांगितले.

अर्थसंकल्पातील मुख्य घोषणा

  • स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतूचे वांद्रे ते वर्सोवा या दरम्यानचे १४ किलोमीटर लांबीचे, १८ हजार १२० कोटी रुपये खर्चाचे काम मे २०२८ पर्यंत पूर्ण होणार 
  • उत्तन ते विरार या सागरी सेतू व जोडरस्त्यांचा ५५ किलोमीटर लांबीचा ८७ हजार ४२७ कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प हाती घेण्यात येणार
  • पुणे ते शिरुर या ५४ किलोमीटर लांबीच्या ७ हजार ५१५ कोटी रुपये किंमतीच्या उन्नत मार्गाचे बांधकाम हाती घेणार
  • गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथून मांडवा, एलिफंटापर्यंत सुरक्षित प्रवासाकरिता अत्याधुनिक सुविधायुक्त बोटींसाठी आर्थिक प्रोत्साहन देण्याचं धोरण जाहीर करणार 
  • मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र, म्हणजेच “ग्रोथ हब” म्हणून विकसित करण्याचा निर्णय
  • वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला-वरळी, वडाळा, गोरेगाव, नवी मुंबई, खारघर व विरार - बोईसर या सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्रे निर्माण केली जाणार 
     

Web Title: Maharashtra Budget 2025: Gift to Mumbai, Pune and Nagpur from the budget; Ajit Pawar made a shower of announcements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.