महादेव जानकरांनी घेतली हर्षवर्धन सपकाळ यांची भेट, पोटनिवडणुकीसंदर्भात झाली चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 20:26 IST2026-03-18T20:26:02+5:302026-03-18T20:26:40+5:30
Mahadev Jankar met Harshvardhan Sapkal: राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी आज गांधी भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा केली.

महादेव जानकरांनी घेतली हर्षवर्धन सपकाळ यांची भेट, पोटनिवडणुकीसंदर्भात झाली चर्चा
राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी आज गांधी भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी महादेव जानकर आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यामध्ये राज्यातील बारामती आणि राहुरी या विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा झाली.
त्यानंतर माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्यात या आधी नांदेड, पुण्यातील कसबा, देगलूर मतदारसंघात पोटनिवडणुका झालेल्या आहेत. नांदेड लोकसभा व देगलूरच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने काँग्रेस विरोधात उमेदवार दिले होते. त्याठिकाणी काँग्रेस विजयी झाली तर कसबा पोटनिवडणुकीतही काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे निवडणुका व सहानुभूती हे दोन वेगळे मुद्दे आहेत.
सपकाळ पुढे म्हणाले की, अजित पवार यांचे अकाली व अपघाती निधन ही दुःखद घटना आहे. बारामतीचा विचार करता या मतदारसंघात विधानसभा व लोकसभा निवडणुकीत पवार विरु्दध पवार निवडणुका झाल्या आहेत व राज्यसभेलाही आठवा उमेदवार असता तर पवार विरुद्ध पवार निवडणूक झालीच असती. बारामती आणि राहुरी या दोन्ही जागेवर आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकांसदर्भात त्यांच्याशी करू आणि त्यानंतर उमेदवार उभा करायचा की नाही, याचा निर्णय घेऊ असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.