Rahul Shewale : "नाशिकचा तिढा लवकरच सुटेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत घोषणा करतील"
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 19:05 IST2024-04-19T18:51:36+5:302024-04-19T19:05:50+5:30
Lok Sabha Election 2024 And Rahul Shewale : नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का बसला असून जागावाटपाचा तिढा अजूनही न सुटल्याने छगन भुजबळ यांनी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचं आज जाहीर केलं. याबाबत राहुल शेवाळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Rahul Shewale : "नाशिकचा तिढा लवकरच सुटेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत घोषणा करतील"
नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का बसला असून जागावाटपाचा तिढा अजूनही न सुटल्याने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचं आज जाहीर केलं आहे. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि खासदार राहुल शेवाळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "नाशिकचा तिढा लवकरच सुटेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत घोषणा करतील" असं म्हटलं आहे.
"सर्व निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. कुठेही तिढा नाही. प्रत्येक ठिकाणी महायुतीत समन्वयाने प्रत्येकाचा सन्मानाने योग्य तो निर्णय घेऊन घेऊन मुख्यमंत्री घोषणा करतील. लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झाली. आज राज ठाकरे यांची भेट झाली, त्याची माहिती दिली. अयोध्येवरून आलो, तिथले जे ट्रस्टी आहेत त्यांनी शिवसेना मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा निरोप दिला तो पोहचवला. दीपक महेश्वरी यांच्या पक्ष प्रवेशासाठी आलो होतो" असं राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.
नाशिक मतदारसंघात पुन्हा एक ट्विस्ट आल्याची चर्चा सुरू झाली आहे. "अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल जागावाटपाच्या चर्चेसाठी दिल्लीला गेले होते. आम्ही आपल्या पक्षाचे नाशिकमध्ये जास्त आमदार असल्याने नाशिक लोकसभेची जागा मागितली. या जागेवर आम्ही आपल्याकडून समीर भुजबळ यांचे नाव सुचवले होते. मात्र अमित शाह यांनी सांगितले की तिथे आपले उमेदवार छगन भुजबळ हे असावेत. तुम्हालाच तिथून लढावे लागेल."
"अजित पवारांनी सांगितल्यानुसार मी नाशिकमध्ये तयारी सुरू केली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने तिथे दावा सांगितला. या गोष्टीला आता तीन आठवडे उलटून गेले आहेत. अजूनही या जागेचा तिढा सुटलेला नाही. दुसरीकडे, समोरच्या पक्षाचा उमेदवार जाहीर होऊन बरेच दिवस झाले आणि ते जोरदारपणे कामाला लागले आहेत. परिणामी महायुतीला नाशिकच्या जागेवर अडचण निर्माण होऊ शकते. हा डेडलॉक तोडण्यासाठी लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे" असं छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं.