आज विषय संपवणार, काँग्रेसची थेट भूमिका; मविआच्या बैठकीत जागांचा तिढा सुटणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 05:08 PM2024-04-03T17:08:52+5:302024-04-03T17:09:44+5:30

Loksabha Election 2024: महाविकास आघाडीत सांगली, भिवंडी आणि मुंबईतल्या जागांवर अद्याप तिढा आहे. त्यात उद्धव ठाकरेंनी सांगली आणि मुंबईतल्या काही जागांवर उमेदवार जाहीर केलेत. जागावाटपावर चर्चा होणार नाही असं ठाकरे गटानं स्पष्ट केले असले तरी काँग्रेसकडून अद्यापही जागांबाबत चर्चा होईल सांगण्यात येतंय. त्यात आज मविआच्या जागावाटपाबाबत शेवटचा टप्पा आहे, विषय संपवणार असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केले आहे. 

Lok Sabha Election 2024 - Maha Vikas Aghadi meeting today regarding constituencies in Sangli, Bhiwandi, Mumbai, Congress will decide today after the meeting | आज विषय संपवणार, काँग्रेसची थेट भूमिका; मविआच्या बैठकीत जागांचा तिढा सुटणार?

आज विषय संपवणार, काँग्रेसची थेट भूमिका; मविआच्या बैठकीत जागांचा तिढा सुटणार?

मुंबई - Congress on Uddhav Thackeray ( Marathi News ) महाविकास आघाडीच्या जागावाटपात अद्यापही ३-४ जागांवर तिढा कायम आहे. त्यात उद्धव ठाकरेंच्या आक्रमक पवित्र्यामुळे काँग्रेसनंही थेट भूमिका मांडली आहे. सांगली, भिवंडी, मुंबईतल्या जागांबाबत आज बैठक होईल. या बैठकीत विषय संपवणार असं सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला. मी काँग्रेसी अन्यथा त्यांच्यापेक्षाही मला हार्ड बोलता येतं, पण बोलणार नाही असं पटोलेंनी म्हटलं. 

मुंबईतल्या पत्रकार परिषदेत नाना पटोले म्हणाले की, सांगलीच्या जागेवर संध्याकाळी बैठक आहे. सांगलीची जागा आम्हाला मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सांगली, भिवंडी आणि मुंबईच्या जागेवर संध्याकाळी बैठक होईल. आज हा विषय आमच्याकडून संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही मैत्रीचा हात पुढे करतो तेव्हा निभावण्याचा प्रयत्न करतो. आम्ही त्यांच्याहून जास्त हार्ड बोलू शकतो परंतु आम्ही काँग्रेसी आहोत. सांगली, भिवंडी आणि मुंबईतल्या जागेसाठी आम्ही आग्रही आहोत. चर्चेतून मार्ग काढला जाईल. आज या जागांचा निर्णय होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

त्याचसोबत  जिथं उमेदवार नाही, मेरिट नाही तिथे आग्रही राहू नये ही आमची भूमिका आहे. भाजपाला हद्दपार करण्यासाठी आम्ही लढतोय. शरद पवार ज्येष्ठ नेते, उद्धव ठाकरे हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. ते काँग्रेसची भूमिका समजून घेतील. महाविकास आघाडीत कुणाला जास्त जागा मिळाली हे महत्त्वाचे नाही. आकडे महत्त्वाचे नाही. मेरिटच्या आधारे आम्ही काम करतोय. आम्ही कुणाकडे मैत्रीचा हात पुढे करत असू तर मैत्री पूर्णपणे निभावण्याचा प्रयत्न करतो. वर्धाला शरद पवारांकडे उमेदवार नव्हते, तिथे आमचा उमेदवार त्यांनी घेतला. ज्याठिकाणी मेरिट नाही तिथे आग्रही राहू नये ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. भाजपाला महाराष्ट्रातून हद्दपार करायचं या आधारे हे निर्णय व्हायला हवेत. अजूनही सामोपचाराने चर्चा करायला तयार आहोत.  जागावाटपाचा वाद सामोपचाराने सोडवू. जागावाटपाचा हा शेवटचा टप्पा असेल. उद्धव ठाकरे शिवसैनिक आहेत ते त्या भाषेत बोलतील. आम्ही काँग्रेस आम्ही आमच्या भाषेत बोलू. भाजपाला हरवण्यासाठी मेरिटवर निर्णय घ्यावा हीच आमची भूमिका राहिली आहे असं नाना पटोलेंनी स्पष्ट केले. 

दरम्यान, महाराष्ट्रातल्या ५ जागांवर पहिल्या टप्प्यात प्रचार सुरू झाला असून इथं महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकतील असं वातावरण आहे. जनतेनं ही निवडणूक हाती घेतली आहे. राहुल गांधी यांच्या आवाहनाला राज्यातील जनता साथ देतेय. प्रकाश आंबेडकर हे भाजपाला नुकसान पोहचवणार आहेत. संविधान बचावासाठी जे लढतायेत त्यांना साथ मिळेल. जे संविधान वाचवण्यासाठी येतायेत त्यांच्यासोबत काँग्रेस आहे. उद्या मी अकोला इथं उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी जाणार आहे. प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर तिथेच उत्तर देईन असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

Web Title: Lok Sabha Election 2024 - Maha Vikas Aghadi meeting today regarding constituencies in Sangli, Bhiwandi, Mumbai, Congress will decide today after the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.