अमित शाहांसोबत चर्चा करायला शरद पवारांनीच सांगितलं होतं; अजित पवारांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 11:56 AM2024-04-22T11:56:59+5:302024-04-22T11:58:21+5:30

अनेकदा तुम्ही आमच्यासोबत यायला तयार होता, त्यानंतर भूमिका बदलता. तुमची भूमिका ठाम नसते असं अमित शाहांनी म्हटलं.

It was Sharad Pawar who asked to discuss with Amit Shah; Ajit Pawar's secret blast | अमित शाहांसोबत चर्चा करायला शरद पवारांनीच सांगितलं होतं; अजित पवारांचा गौप्यस्फोट

अमित शाहांसोबत चर्चा करायला शरद पवारांनीच सांगितलं होतं; अजित पवारांचा गौप्यस्फोट

पुणे - Ajit Pawar on Sharad Pawar ( Marathi News ) अनेकदा शरद पवार हे भाजपासोबत जाण्यास तयार होते, अमित शाहांसोबत चर्चा करायला पवारांनीच सांगितले असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे. त्याचसोबत बारामतीतील जनतेनं विकासासाठी साथ द्यावी असं आवाहनही त्यांनी केले. 

अजित पवार म्हणाले की, जेव्हा राज्यात उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं, तेव्हा माझ्याच चेंबरमध्ये सर्व विधानसभा, विधान परिषदेच्या आमदारांनी आपल्याला सरकारमध्ये गेले पाहिजे असं पत्र सह्या करून शरद पवारांना दिले. त्यात एकही जण मागे नव्हता. जयंत पाटील, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे यांचीही सही होती. टोपेच पत्र घेऊन गेले होते. मतदारसंघातील कामे आता सुरू झाली, २ वर्ष कोरोनामुळे अडचणीत गेली. लोकांची कामे व्हावी या भूमिकेतून हा निर्णय घेतला होता. त्यानंतर शरद पवार साहेबांनी मला, प्रफुल पटेल आणि जयंत पाटील यांना अमित शाह यांच्याशी चर्चा करा असं सांगितले. आम्ही जायला निघालो होतो, त्यानंतर साहेबांनी तिथे जाऊ नका, इथूनच फोनवरून चर्चा करा म्हटलं. त्यावर अमित शाह यांनी अशी महत्त्वाची चर्चा फोनवर होत नाही, तुमचा पाठिमागचा अनुभव पाहता अनेकदा तुम्ही आमच्यासोबत यायला तयार होता, त्यानंतर भूमिका बदलता. तुमची भूमिका ठाम नसते. त्यामुळे तुमच्यासोबत फोनवर बोलण्याची विश्वासार्हता नाही. तुम्ही समोर या, भेटून बोलू, मी फोनवर बोलणार नाही असं अमित शाहांनी स्पष्ट सांगितले. 

तसेच शिवसेनेला बाहेर काढून आम्हाला सोबत घ्या अशी अट २०१७ मध्ये होती. परंतु भाजपाने शिवसेना इतकी वर्ष आमच्यासोबत आहे. त्यांना बाहेर काढणार नाही असं ठाम सांगितले. त्यानंतर २०१९ ला अशाप्रकारचा प्रयोग झाला. आम्ही केंद्रात कुणाच्या संपर्कात नव्हतो. केवळ शरद पवार, प्रफुल पटेल हेच केंद्रातील नेत्यांच्या संपर्कात होते असंही अजित पवारांनी म्हटलं.  एबीपीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 

दरम्यान, राजकारणात भावनिकपणा बाजूला ठेवावे लागते. बारामतीची जनतेचा मिश्र प्रतिसाद आहे. मी माझ्यापरीने पटवून देण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला अधिकचा विकास हवा असेल तर राज्य आणि केंद्र सरकार एकत्र आले तर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या फायद्याचे होईल. जोपर्यंत सर्वसामान्य मतदार माझ्या पाठिशी उभा आहे तोपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्याची कारकिर्दी संपत नाही. मी जी गोष्ट हाती घेतो, ती तडीस नेतो. आजपर्यंत मी कुणाचे नुकसान केले नाही. मी माझे ध्येर्य ठरवून पुढे वाटचाल करत आहे. मी राजकीय भूमिका घेतली, त्यावर ठाम आहे. वडिलधाऱ्यांनी आशीर्वाद द्यावेत, लोकांनी आणि मतदारांनी साथ द्यावी असं अजित पवारांनी सांगितले. 

राजकारणात अनेक चढउतार पाहिलेत 

१९९१ पासून स्वत: उमेदवार या नात्याने वेगवेगळ्या निवडणूक लढवल्या आहेत. राजकारणात अनेक चढउतार पाहिलेत. मला निवडणुका नवीन नाही. माझ्यासमोर कुणीही उभं असलं तरी समोरचा उमेदवार तुल्यबळ आहे असं समजून प्रचाराची रणनीती आखतो. बारामती हा माझा मतदारसंघ आहे. आम्ही आमच्यापरीनं प्रयत्न करतोय. ही लढाई भावकी आणि गावकीची नाही. ही लढाई देशाचं भवितव्य ठरवणारी, उद्याचा कारभार कुणाच्या हातात द्यायचा अशी ही लढाई आहे. लोकांनी एकीकडे नरेंद्र मोदी आणि दुसरीकडे राहुल गांधी असं पाहायचं आहे. भावनिक बनून मतदान करू नका. सत्ताधारी विचाराचा खासदार केंद्रात गेला तर कामे अधिक होतात. विरोधात असले तर सगळ्या गोष्टींना विरोध करायचा, त्यातून मतदारसंघातील कामे थांबतात. केंद्रातून येणारा निधी मोठ्या प्रमाणात खर्च होत नाही असं अजित पवारांनी म्हटलं. 
 

Web Title: It was Sharad Pawar who asked to discuss with Amit Shah; Ajit Pawar's secret blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.