छगन भुजबळांनी अद्याप संपर्क केला नसला तरी...; उद्धव ठाकरेंनी काय दिले उत्तर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 14:07 IST2024-12-17T14:05:51+5:302024-12-17T14:07:56+5:30
Uddhav Thackeray on Chhagan Bhujbal: मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज आहेत. त्यांच्या नाराजीबद्दल उद्धव ठाकरेंनी भाष्य केले, तसेच ते अधूनमधून संपर्कात असतात, असेही सांगितले.

छगन भुजबळांनी अद्याप संपर्क केला नसला तरी...; उद्धव ठाकरेंनी काय दिले उत्तर?
Chhagan Bhujbal Uddhav Thackeray News: मंत्रिमंडळात समावेश करण्यात न आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ नाराज झाले आहेत. त्यांनी नाराजी व्यक्त केली असून, चर्चा करून पुढचा निर्णय घेऊन अशी भूमिका मांडली. त्यामुळे भुजबळ अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार, अशी चर्चा रंगू लागली आहे. शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना छगन भुजबळ यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भुजबळांसोबत जे घडलं ते फार वाईट आहे, असे म्हटले.
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाला उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळालेल्यांना ठाकरेंनी चिमटा काढला.
उद्धव ठाकरे म्हणाले, "मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, पण विस्तारापेक्षा मंत्रिमंडळाच्या वजाबाकीची चर्चा अधिक रंगली आहे. मंत्रिपद मिळालेल्यांच्या फटाक्यांपेक्षा नाराजांचे बार जास्त वाजत आहेत."
देवेंद्र फडणवीसांना ठाकरेंचा टोला
"मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री सहकाऱ्यांचा परिचय सभागृहाला करून देतात. मला वाटतं ही पहिली वेळ असेल की, ज्यांच्यावर ढीगभर पुरावे देऊन आरोप केले. ज्यांच्यावर ईडीच्या धाडी पडल्या, त्यांचा मुख्यमंत्र्यांना सहकारी म्हणून ओळख करून द्यावी लागली. हे कोणते आणि कसे सरकार आहे?", असा टोला ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
छगन भुजबळांच्या नाराजीबद्दल ठाकरे काय बोलले?
भुजबळांच्या नाराजीकडे उद्धव ठाकरेंचं लक्ष वेधण्यात आलं. तुमच्याकडे आले, तर त्यांना घेणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ठाकरे म्हणाले, "असं काही नाही. ते काही बोलले तर मी उत्तर देईन. आपण कशाला त्यावर बोलायचं. भुजबळांबद्दल मला फार वाईट वाटलं. अशा अनेक जणांबद्दल मला आतून वाईट वाटतंय. अपेक्षांनी ते तिकडे गेले होते", असे ठाकरे म्हणाले.
"छगन भुजबळांनी अद्याप संपर्क केला नसला तरी भुजबळ अधून माझ्या संपर्कात असतात", असे उद्धव ठाकरे म्हणाले.
अनेकांचे निरोप येत आहेत -उद्धव ठाकरे
"मला कुणीतरी विचारलं की कुणी संपर्कात आहेत का? अनेकजणांचे निरोप येताहेत. त्यांना आता कळतंय की, माझी भूमिका बरोबर होती. शेवटी अनुभवासारखा उत्तम गुरू नसतो. तो गुरू त्यांना मिळालेल्या आहे. त्यातून त्यांना शिकवणूक मिळू द्या, त्यातून ते सुधरले तर मग आपण बघू", अशी भूमिका उद्धव ठाकरेंना मांडली.