शिंदेंची शिवसेना उद्या पहिली यादी जाहीर करणार; कोण असतील संभाव्य उमेदवार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 13:59 IST2024-03-25T13:58:18+5:302024-03-25T13:59:05+5:30
Eknath Shinde will Declare first list of Loksabha Candidate : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून सगळेच पक्ष उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. त्यात भाजपाने राज्यातील २३ जागांची उमेदवारी यादी जाहीर केली. आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनाही पहिली यादी २६ मार्चला जाहीर करण्याची शक्यता आहे.

शिंदेंची शिवसेना उद्या पहिली यादी जाहीर करणार; कोण असतील संभाव्य उमेदवार?
मुंबई - Shivsena First List of LS Candidate ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्ष तयारीला लागलेत. त्यात राज्यात महायुतीकडून भाजपाने २३ उमेदवारांच्या २ याद्या जाहीर केल्या आहेत. तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पहिली यादी उद्या २६ मार्चला घोषित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिंदेच्या शिवसेनेची पहिली यादी उद्या जाहीर होईल असं संजय मंडलिक यांनी सांगितले आहे. रामटेकमधून राजू पारवे, वाशिम-यवतमाळमधून संजय राठोड यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे. तर मावळमध्ये श्रीरंग बारणे आणि कोल्हापूरातून संजय मंडलिक यांनाच उमेदवारी देण्यात येईल असं बोललं जाते.
संभाव्य उमेदवार?
रामटेक - राजू पारवे
वाशिम-यवतमाळ - संजय राठोड
ठाणे - प्रताप सरनाईक
कल्याण डोंबिवली - श्रीकांत शिंदे
दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे
मावळ - श्रीरंग बारणे
कोल्हापूर - संजय मंडलिक
हातकणंगले - धैर्यशील माने
बुलढाणा - प्रतापराव जाधव
शिर्डी - सदाशिव लोखंडे
हिंगोली, उत्तर पश्चिम मुंबई, पालघर आणि नाशिकच्या जागेवर अद्यापही महायुतीत चर्चा सुरू आहे. नाशिकच्या जागेवरून शिंदे गट आणि भाजपा यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. नाशिकमध्ये पुन्हा उमेदवारी मिळावी आणि ही जागा शिवसेनेकडेच राहावी यासाठी हेमंत गोडसेंसह शिवसेनेचे पदाधिकारी, नेते यांनी ठाण्यात शक्तिप्रदर्शन केले.
तर मनसेच्या महायुतीतील चर्चेमुळे दक्षिण मुंबईतील जागेवरही अद्याप कुणाचे नाव पुढे आले नाही. दक्षिण मुंबईची जागा ही शिवसेनेची आहे. याठिकाणी विद्यमान खासदार अरविंद सावंत हे उद्धव ठाकरेंसोबत कायम राहिलेत. त्यात या जागेवर भाजपाचे राहुल नार्वेकर निवडणूक लढवतील असं बोलले गेले. त्यारितीने नार्वेकर प्रचारालाही लागले. परंतु त्याच काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपाचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर मनसे महायुतीत सहभागी होणार अशी चर्चा सुरू झाली. त्यात दक्षिण मुंबईची जागा मनसेला दिली जाईल असं बोलले गेले. त्यामुळे या जागेवर नेमकं कोण उभं राहते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.