“अशोक चव्हाणांची स्वतःची ओळख काय? काँग्रेसवर बोलू नये”; नाना पटोलेंनी सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 15:18 IST2024-04-01T15:17:31+5:302024-04-01T15:18:25+5:30
Congress Nana Patole News: काँग्रेसवर टीका करण्यापेक्षा स्वतःचे बघा, असा पलटवार नाना पटोलेंनी अशोक चव्हाणांच्या टीकेवर केला आहे.

“अशोक चव्हाणांची स्वतःची ओळख काय? काँग्रेसवर बोलू नये”; नाना पटोलेंनी सुनावले
Congress Nana Patole News: संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा मोठा वर्ग आहे. महाविकास आघाडीच्या जागा अंतिम होत नाहीत. प्रकाश आंबेडकरांना ज्या पद्धतीने वागवले आहे, तेही नाराज झाले आहेत. अन्य घटकपक्षही नाराज आहेत. काँग्रेसची फरफट सुरू आहे. काँग्रेसच्या महाराष्ट्रातील विद्यमान नेतृत्वामुळे पक्षाचे महत्त्व कमी झाले आहे. काँग्रेसला आता कुणी विचारत नाही, अशी परिस्थिती आहे, या शब्दांत भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी हल्लाबोल केला. याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिले.
अलीकडेच माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपामध्ये प्रवेश केला होता. यानंतर लगेचच भाजपाने अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले. यानंतर आता अशोक चव्हाण लोकसभेच्या तयारीला लागले आहेत. सभा, बैठका यांमध्ये भाजपाचा जोरदार प्रचार करताना ते दिसत आहेत. तसेच काँग्रेसवर टीकाही करत आहेत. अशोक चव्हाण यांनी केलेल्या टीकेचा नाना पटोले यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला.
अशोक चव्हाणांची स्वतःची ओळख काय? काँग्रेसवर बोलू नये
भ्रष्टाचारी लोकांसाठी आमची दारे उघडी असे भाजपचे नेते सांगतात. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या भरवशावर मालमत्ता कमावली. भ्रष्टाचार केले. सत्ता भोगली. आता भाजपत गेले. अशोक चव्हाण यांची स्वतःची ओळख काय? त्यांच्या मतदारसंघात अशोक चव्हाण यांची परिस्थिती चांगली नाही. काँग्रेसवर टीका करण्यापेक्षा स्वतःचे बघा. काँग्रेसवर बोलू नये, असा पलटवार नाना पटोलेंनी केला.
दरम्यान, योग्य वेळेची संधी पाहतो आहे. चार दिवसांत प्रकाश आंबेडकर यांना उत्तर देणार आहे. पहिल्या टप्प्यात आजपासून काँग्रेसचा प्रचार जोमाने सुरु झाला आहे. पहिल्या टप्प्यातील सर्व पाच जागा आम्ही जिंकू असेच आजचे चित्र आहे, असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला.