"भाजपचे एक मतही राष्ट्रवादी काँग्रेसला पडू देणार नाही", लातूरमध्ये महायुतीत कलह!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 16:15 IST2024-09-01T16:13:32+5:302024-09-01T16:15:18+5:30
Mahayuti Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीच्या राज्य पातळीवरील नेत्यांकडून तिन्ही पक्षात समन्वय असल्याचे दावे केले जात आहेत. पण, वेगवेगळ्या मतदारसंघात स्थानिक पातळीवर सुप्त संघर्ष होताना दिसत आहे.

"भाजपचे एक मतही राष्ट्रवादी काँग्रेसला पडू देणार नाही", लातूरमध्ये महायुतीत कलह!
BJP NCP Maharashtra Assembly election : महायुतीमध्ये सगळे काही आलबेल आहे, असे दावे राज्याच्या पातळीवरील नेते करत असले, तरी राज्याच्या वेगवेगळ्या भागांत तिन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये संघर्ष होताना दिसत आहे. लातूरच्या भाजप जिल्हाध्यक्षांनी अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत पक्षाचे एकही मत न देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे इथे कलह निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
लातूर ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्षांनी केलेल्या विधानामुळे स्थानिक पातळीवर भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समन्वय करण्याचे आव्हान महायुतीसमोर आहे. महत्त्वाचे म्हणजे अजित पवार यांची जनसन्मान यात्रा अहमदपूरमधून गेल्यानंतर भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी हा इशारा दिला आहे.
भाजप जिल्हाध्यक्ष देशमुख काय म्हणाले?
भाजपचे लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख म्हणाले की, "अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारासाठी काम केले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे एकही मत भाजपला पडले नाही. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा लोकसभेत पराभव झाला."
"राष्ट्रवादी काँग्रेसला एकही मत पडू देणार नाही"
"अडीच हजार कोटी रुपयांचा निधी मतदारसंघात आणण्यात आला आहे. मात्र, निधी वाटपात भाजपच्या कार्यकर्त्यांना डावलले गेले. भाजप म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांचे डोकं उठत होते. आता विधानसभेची निवडणूक आहे. भाजपचे एकही मत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांना पडणार नाही. आम्ही पडू देणार नाही", अशी भूमिका देशमुख यांनी जाहीर केली.