बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 16:59 IST2024-11-20T16:58:06+5:302024-11-20T16:59:08+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सुप्रिया सुळे आणि नाना पटोले हे दोघेही क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यात सहभागी आहेत. या दोन्ही नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी बिटकॉइनचा गैरव्यवहार केला, असा आरोप माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी केला आहे.

बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले
महाराष्ट्र विधानसभेसाठी आज संपूर्ण राज्यात मतदान होत आहे. यातच माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर बिटकॉईन घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. या दोन्ही नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी बिटकॉइनचा गैरव्यवहार केल्याचे त्यांनी म्हटले आहे. यानंतर राजकारण तापताना दिसत आहे. भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही पत्रकार परिषद घेत, परदेशी चलनाचा वापर करून, अशा प्रकारे निवडणुकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला जात असून, याची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. यानंतर, आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अजित पवार? -
बिटकॉइन प्रकरणासंदर्भात पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, "यासंदर्भात चौकशी करणे आणि चौकशी करून काय सत्य आहे हे पडताळले जायला हवे. मी नाना पटोले यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. यामुळे मला त्यांचा आवाज चांगला माहित आहे. अर्थात आवाजाबद्दल मी बरोबरच असेल, अशातला भाग नाही. अनेकवेळा हुबेहुब आवाज काढणारे लोकही समाजात आहेत. पण, त्या दोघांबद्दल (सुप्रिया सुळे आणि नाना पटोले) जे ऐकायला येत आहे, त्यांनी जे मांडले आहे, त्या दोन्ही व्यक्ती त्याच आहेत. तो सुप्रिया सुळे यांचाच आवाज आहे आणि ते नाना पटोलेच आहेत."
नेमके प्रकरण काय? -
सुप्रिया सुळे आणि नाना पटोले हे दोघेही क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यात सहभागी आहेत. या दोन्ही नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी बिटकॉइनचा गैरव्यवहार केला, असा आरोप माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी केला आहे. पुण्याचे माजी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि सायबर गुन्हे अन्वेषण विभागाच्या भाग्यश्री नवटके हे बिटकॉइन घोटाळ्यात सहभागी होते. तसेच सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचे संरक्षण होते, असा मोठा दावाही पाटील यांनी केला आहे.