कोल्हापुरात अमित शाह यांची साखरपेरणी, साखर कारखानदारांसह बँकांच्या प्रमुखांना लावले कामाला 

By राजाराम लोंढे | Published: May 6, 2024 01:34 PM2024-05-06T13:34:58+5:302024-05-06T13:35:53+5:30

महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढल्याचे चित्र 

Union Home Minister Amit Shah has put sugar millers and bank chiefs to work in Kolhapur for the Lok Sabha elections | कोल्हापुरात अमित शाह यांची साखरपेरणी, साखर कारखानदारांसह बँकांच्या प्रमुखांना लावले कामाला 

कोल्हापुरात अमित शाह यांची साखरपेरणी, साखर कारखानदारांसह बँकांच्या प्रमुखांना लावले कामाला 

राजाराम लोंढे

कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक रात्र कोल्हापुरात घालवून चांगलीच साखर पेरणी केली आहे. ‘कोल्हापूर’ व ‘हातकणंगले’ मतदारसंघातील साखर कारखानदार, सहकारी बँकांच्या प्रमुखांशी चर्चा करून त्यांनी योग्य तो संदेश दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवस ठोकलेला तळ, पडद्यामागून लावलेल्या जोडण्या पाहता, गेल्या दोन दिवसांपासून महाविकास आघाडीची डोकेदुखी काहीशी वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

‘कोल्हापूर’ मतदारसंघात काॅंग्रेसचे शाहू छत्रपती व शिंदेसेनेचे संजय मंडलिक यांच्यात निकराची झुंज आहे. शाहू छत्रपती यांची उमेदवारी लवकर जाहीर झाल्याने ते वातावरण तयार करण्यात यशस्वी झाले. संजय मंडलिक यांच्या उमेदवारीचा शेवटपर्यंत घोळ सुरू राहिल्याने त्यांच्या समर्थकांमध्येच चलबिचल असल्याने प्रचाराला उशिरा सुरुवात झाली. मात्र, महायुतीची फौज घेऊन त्यांनी प्रचाराला गती घेतली आहे. कोल्हापुरात सरळ लढत होत असल्याने विजयाचा लंबक सतत फिरत आहे. 

‘हातकणंगले’मध्ये उद्धवसेनेने ऐनवेळी सत्यजीत पाटील यांची उमेदवारी जाहीर करून ते हवा तयार करण्यात यशस्वी झाले आहेत. उमेदवारी मिळते की नाही? या गोंधळात शिंदेसेनेची उमेदवारीची माळ गळ्यात पाडण्यात धैर्यशील माने यशस्वी झाले. आघाडीला आपल्याशिवाय पर्याय नाही, हे गृहीत धरून कामाला लागलेले राजू शेट्टी यांना एकला चलोची भूमिका घ्यावी लागली. या सगळ्या पार्श्वभूमीवर येथे अस्तित्वाची तिरंगी लढत होत आहे. दोन्ही मतदारसंघांतील अंदाज महायुतीच्या नेत्यांना आल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी येथे तळ ठोकला आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह हे एक दिवस येऊन गेले. त्यांना ज्यासाठी आणले होते, तो उद्देश सफल झाल्याची चर्चा आहे.

दोन्हीकडे ११ सहकारी, तर १२ खासगी कारखानदार आहेत. त्या सगळ्यांसह प्रमुख बँकांचे पदाधिकाऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला असून, त्यांच्यापर्यंत योग्य तो संदेश पोहच केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनीही जोडण्या लावल्या असून, त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून जोरदार घडामोडी घडत आहेत.

जोडण्यांसाठी ठाणे, पुण्यातील टीम

महायुतीच्या उमेदवारांसाठी जोडण्या लावण्यांसाठी ठाणे, पुण्यातील टीम कोल्हापुरात तळ ठोकून आहे. आघाडीतील काही मासे गळाला लागतात का? यावर ते नजर ठेवून आहेत.

Web Title: Union Home Minister Amit Shah has put sugar millers and bank chiefs to work in Kolhapur for the Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.