Kolhapur Municipal Election 2026: महायुतीमध्ये चार जागांवरून वाद; फडणवीस, शिंदे घेणार निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 12:17 IST2025-12-29T12:14:43+5:302025-12-29T12:17:46+5:30
भाजप, शिंदेसेनेत प्रचंड रस्सीखेच, राष्ट्रवादीला १५ जागा

Kolhapur Municipal Election 2026: महायुतीमध्ये चार जागांवरून वाद; फडणवीस, शिंदे घेणार निर्णय
कोल्हापूर : पुलाची शिरोली येथील महादेवराव महाडिक यांच्या पंपावर कोल्हापूर महापालिकेसाठीच्या महायुतीच्या जागांचा रविवारी दुपारी पूर्ण गुंता न सुटल्याने पुन्हा रात्री शाहूपुरीमध्ये एके ठिकाणी बैठक झाली. या बैठकीत ७७ जागांवर एकमत झाले. उर्वरित ४ जागांचा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याची जबाबदारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
तरीही भाजप ३४, शिंदेसेना ३२ आणि राष्ट्रवादी (अजित पवार) १५ यावर जवळपास एकमत होत आले असून आज, सोमवारी याची घोषणा होण्याची शक्यता आहे. यातील राष्ट्रवादी (अजित पवार) च्या १५ जागा निश्चित मानल्या जात असून भाजप-शिंदेसेनेच्या जागांची संख्या बदलण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी संपत असताना अजूनही महायुतीची यादी जाहीर न झाल्याने उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
वाचा : काँग्रेसचे आणखी १४ उमेदवार जाहीर, उमेदवारी जाहीर झालेले सर्व उमेदवार आज अर्ज भरणार
पुलाची शिरोली पंपावरून संध्याकाळी सहा वाजता पूर्ण एकमत न झाल्याने नेतेमंडळी बाहेर पडली. पुन्हा साडेसातनंतर थोडे बदल करून शाहूपुरीमध्ये एके ठिकाणी मंत्री चंद्रकांत पाटील वगळता इतरांची बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली; परंतु चार जागांवर घोडे अडले. भाजप, शिंदेसेना एकही पाऊल मागे घ्यायला तयार नसल्याने अखेर फडणवीस, शिंदे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. तसा निरोपही मंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आला. त्यानुसार सोमवारी सकाळी शक्य तितक्या लवकर विषय संपवून महायुतीचे उमेदवार संयुक्तरीत्या जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
दक्षिणच्या जागेवरून वाद
दक्षिणमध्ये शिंदेसेेनेने बहुतांशी जागा खुल्या प्रवर्गातील मागितल्या आहेत. त्यामुळे भाजपची तिथे कोंडी झाली आहे. यावरूनच शिरोली पंपावरील चर्चेत शाब्दिक चकमकही घडल्याचे समजते. बहुतांशी ठिकाणी शिंदेसेनेने खुल्या जागांवरील उमेदवार निश्चित केल्याने आमच्या कार्यकर्त्यांनी काय करायचे, असा सवाल या बैठकीत भाजपकडून करण्यात आला.
मॅरेथॉन बैठका, परंतु निर्णय नाही
दुपारी पुलाची शिरोली येथील महाडिक यांच्या पंपावरील बैठक, त्यानंतर माजी नगरसेवक रत्नेश शिरोळकर यांच्या कार्यालयात शिंदेसेनेच्या नेत्यांची बैठक, शाहूपुरीतील वृत्तवाहिनीच्या कार्यालयात भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक आणि नंतर शाहूपुरातील एका ठिकाणी दीड तास चर्चा होऊनही भाजप आणि शिंदेसेनेत एकमत झाले नाही आणि अखेर याचा निर्णय मुंबईत होईल, असे जाहीर करण्यात आले.