सतेज पाटील यांना निकालादिवशीच समजेल भाजपची ‘बी’ टीम कोण, हसन मुश्रीफ यांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 13:17 IST2026-01-07T13:16:55+5:302026-01-07T13:17:51+5:30
कोल्हापूरचा स्वर्ग करू

सतेज पाटील यांना निकालादिवशीच समजेल भाजपची ‘बी’ टीम कोण, हसन मुश्रीफ यांचा पलटवार
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनसुराज्य पक्ष हे भाजपची ‘बी’ टीम आहेत असा आरोप काँग्रेसचे होऊ घातलेले विरोधी पक्षनेते आमदार सतेज पाटील यांनी केला आहे. परंतु महापालिकेच्या निकालादिवशीच राष्ट्रवादी, जनसुराज्य की काँग्रेस ‘बी’ टीम आहे हे त्यांना कळेल, असा पलटवार वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.
प्रभाग क्रमांक आठ, नऊ, दहा आणि तेरामधील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, भाजपाचे शहराध्यक्ष विजय जाधव, उमेदवार व महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले, केंद्रासह राज्यांमध्ये कुठेही यांची सत्ता नाही. त्यामुळे विकासकामांसाठी निधी कुठून आणणार आणि कोल्हापूर शहराचा विकास कसा करणार, हा खरा संशोधनाचाच विषय आहे. कुठेच सत्ता नाही ही वस्तुस्थिती असताना काँग्रेसवाले मात्र नागरिकांची दिशाभूल करत आहेत. कोल्हापूरच्या सूज्ञ नागरिकांनी या दिशाभुलीला बळी पडू नये.
वाचा : उमेदवार घरोघरी प्रचारात; तर नेते उणीदुणा काढण्यात दंग
सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था या रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण यासारखे नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी असतात. कोल्हापूर महापालिकेची सत्ता महायुतीकडे दिल्यास शहरात विकासाची गंगा येईल. महायुतीचे सर्वच नगरसेवक गोरगरिबांच्या, सामान्य नागरिकांच्या जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी कल्याणकारी योजना घराघरांपर्यंत पोहोचवतील.
कोल्हापूरचा स्वर्ग करू
मुश्रीफ म्हणाले, कागल शहरांमध्ये झालेल्या अभूतपूर्व विकासाची माहिती घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की, संधी मिळाली आणि सत्ता, निधी उपलब्ध असेल तर शहराचा कसा स्वर्ग होऊ शकतो. महायुतीला साथ द्या, कोल्हापूरचा स्वर्ग केल्याशिवाय राहणार नाही.