कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दिवसभर उघडीप, रात्रभर मुसळधार; राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 14:19 IST2025-07-29T14:18:30+5:302025-07-29T14:19:29+5:30
पंचगंगा ३६ फुटांवर : ५५ बंधारे पाण्याखाली, वाहतूक विस्कळीत

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दिवसभर उघडीप, रात्रभर मुसळधार; राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद
कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची उघडीप असली तरी रात्री जोरदार कोसळत आहे. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर असल्याने विसर्ग कायम आहे. परिणामी, नद्यांच्या पातळीत वाढ होत असून, पंचगंगा ३५.०५ फुटांवरून वाहत आहे. जिल्ह्यातील ५५ बंधारे पाण्याखाली गेले असून, या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, आज, मंगळवारी सकाळी राधानगरीधरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत.
दोन दिवसांपेक्षा सोमवारी पावसाचा जोर कमी झाला असला तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. विशेष म्हणजे दिवसभर उघडीप असली तरी रात्री झोडपून काढत आहे. धरणक्षेत्रात तुलनेत पाऊस कमी झाला आहे. सोमवारी दिवसभरात राधानगरी धरणक्षेत्रात १९, वारणा १४ तर दूधगंगा धरणक्षेत्रात १० मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
राधानगरी धरणाचे सहा स्वयंचलित दरवाजे बंद झाले असून सहाव्या क्रमांकाचा सुरू आहे. राधानगरी धरणातून प्रति सेकंद १५००, वारणातून १४ हजार ७२५ तर दूधगंगा धरणातून ५६०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पुराचे पाणी वाढत आहे.
एसटीचे सात मार्ग ठप्प
जिल्ह्यातील बंधाऱ्यावर पुराचे पाणी आल्याने एसटीचे सात मार्ग ठप्प झाले आहेत. राज्य मार्ग ४ व प्रमुख जिल्हा मार्ग ७ अशा अकरा मार्गांवर पाणी आहे. रंकाळा-पडसाळी, वाशी, चौके, गवशी, आरळे यासह चंदगड तालुक्यातील मार्ग बंद आहेत.