एक तास २५ मिनिटांत पोहचणार हैदराबादमध्ये, कोल्हापूर विमानतळावरुन २७ ऑक्टोबरपासून सुरु होणार सेवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 13:37 IST2025-10-03T13:35:56+5:302025-10-03T13:37:07+5:30
२५ शहरांना कनेक्टिव्हिटी

संग्रहित छाया
गोकुळ शिरगाव: कोल्हापूरच्या हवाई वाहतूक क्षेत्रात मोठी भर पडणार असून, इंडिगो एअरलाइनतर्फे कोल्हापूर ते हैदराबाददरम्यान नवीन थेट विमानसेवा सुरु करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही सेवा येत्या २७ ऑक्टोबरपासून हिवाळी सत्रात कार्यान्वित होणार आहे. यामुळे कोल्हापूरकरांची देशातील अनेक महत्वाच्या शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.
नवीन फ्लाइटचे वेळापत्रक निश्चित झाले असून ६E ७३४४ फ्लाइट कोल्हापूरहून हैदराबादसाठी आठवड्यातून चार दिवस -सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार सकाळी ८:४५ वाजता उड्डाण करेल. या प्रवासासाठी साधारण १ तास २५ मिनिटांचा फ्लाइंग टाइम असेल. या सेवेमुळे कोल्हापूरकरांना हैदराबादमार्गे देशातील २५ हून अधिक शहरांना पोहोचण्याची संधी मिळणार आहे.
त्यामध्ये म्हैसूर, वडोदरा, गोरखपूर, कडप्पा, विशाखपट्टणम, कलकत्ता (कोलकाता), लखनऊ, दिब्रुगड, दिल्ली, वाराणसी, भुवनेश्वर, जगदलपूर आणि मुंबई यांसारख्या प्रमुख शहरांचा समावेश आहे. जिथे दुपारपर्यंत पोहोचता येईल. तसेच अहमदाबाद, श्रीनगर, कोची, इंदौर, कोईम्बतूर यांसारख्या शहरांसाठी दुपार ते संध्याकाळपर्यंत कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल.
याशिवाय दोहा येथे जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय फ्लाइटचे कनेक्शन देखील उपलब्ध राहणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नियमित उड्डाणांसाठी सर्वतोपरी योजना व सेवा देण्याचे आश्वासन दिले आहे. विमानतळ संचालक अनिल शिंदे यांनी सांगितले की, इंडिगोच्या हैदराबाद व बंगळूर येथून चालू असलेल्या फेऱ्यांच्या वेळेत ५ ते १० मिनिटांचा किरकोळ बदल करण्यात आला आहे.