Kolhapur: राधानगरीत मुसळधार पाऊस, धरण ९९ टक्के भरले; स्वयंचलित दरवाजे खुले होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 17:04 IST2025-07-25T17:00:06+5:302025-07-25T17:04:50+5:30
स्वयंचलित दरवाज्यांतून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यास भोगावती, पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार

Kolhapur: राधानगरीत मुसळधार पाऊस, धरण ९९ टक्के भरले; स्वयंचलित दरवाजे खुले होण्याची शक्यता
राधानगरी : कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. परिणामी धरणपाणीसाठ्यात वाढ होत आहे. जिल्ह्यातील सात धरणे १०० टक्के भरली असून राधानगरी धरणातही ९९ टक्के पाणीसाठा झाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील २४ तासांत स्वयंचलित दरवाजे खुले होऊ शकतात.
राधानगरी धरणाची पाणीपातळी आज, शुक्रवारी दुपारी ४ वाजता ३४६.९० फूट इतकी नोंदवली आहे. ३४७. ५० फूटाला धरण पूर्ण क्षमतेने भरले जाते. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरून स्वयंचलित दरवाज्यांतून पाण्याचा विसर्ग सुरु होणार आहे. त्यामुळे भोगावती, पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नदीकाठावरील शेतीसाठी वापरली जाणारी साधनसामग्री तत्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत, पंपिंग सेट, विद्युत मोटारी, शेती अवजारे, इतर साहित्य नदीकाठापासून दूर ठेवावीत. नदीपात्रात जनावरांना सोडू नये असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.