कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा, राधानगरीत जोरदार पाऊस; राधानगरी धरणातून विसर्ग वाढला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 14:25 IST2025-09-02T14:25:23+5:302025-09-02T14:25:54+5:30

उद्यापासून जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’

Heavy rain in Gaganbawda, Radhanagari in Kolhapur district Discharge from Radhanagari dam increased | कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा, राधानगरीत जोरदार पाऊस; राधानगरी धरणातून विसर्ग वाढला 

छाया-नसीर अत्तार

कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. गगनाबवडा, राधानगरी, शाहूवाडी, भुदरगड, आजरा तालुक्यांत तुलनेत अधिक पाऊस होता. धरणक्षेत्रातहीपाऊस वाढल्याने राधानगरीचा तिसऱ्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा पुन्हा खुला झाला आहे. यातून प्रतिसेकंद २९२८ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पाऊस वाढला असला तरी पाण्याचा निचरा वेगाने होत असल्याने नद्यांची पातळी २१ ते २२ फुटांपर्यंत स्थिर राहिली आहे. उद्या, बुधवारपासून दोन दिवस जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला असून, या कालावधीत विशेषत: घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. रविवारी तुलनेत कमी पाऊस होता. पण, मध्यरात्रीपासून पावसाने पुन्हा जाेर पकडला आहे. सोमवारी सकाळी तर जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात जरा जोर अधिक होता. दुपारनंतर कोल्हापूर शहरासह पूर्वेकडील तालुक्यात जोर वाढला. थांबून थांबून जोरदार सरी कोसळत होत्या.

पाऊस वाढला असला तरी नद्यांची पातळी मात्र स्थिर दिसत आहे. सोमवारी सकाळी पंचगंगा नदीची पातळी २२.३ फुटांवर होती. मात्र, सायंकाळ पाच वाजात ती २१.४ फुटांपर्यंत खाली आली. अलमट्टी व हिप्परगी धरणातून विसर्ग सुरू असल्याने पाण्याचा निचरा झपाट्याने होत आहे. अद्याप वीस बंधारे पाण्याखाली असून, दहा मार्ग पाण्यामुळे बंद आहेत.

दरम्यान, सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ६.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक ३३.३ मिलिमीटर गगनबावडा तालुक्यात झाला. या कालावधीत जिल्ह्यातील ४ खासगी मालमत्तांची पडझड होऊन २ लाख २० हजारांचे नुकसान झाले आहे.

असा आहे धरणातून विसर्ग..

धरण - विसर्ग प्रतिसेंकद घनफूट

  • राधानगरी - २९२८
  • वारणा - १६३०
  • दूधगंगा - ४६००
  • घटप्रभा - २२४१
  • धामणी - ३३५६

Web Title: Heavy rain in Gaganbawda, Radhanagari in Kolhapur district Discharge from Radhanagari dam increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.