Kolhapur Municipal Election: महायुतीत संभ्रम कायम, स्वतंत्र लढण्याचीही तयारी जोरात; इच्छुकांसह नेतेही लागले कामाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 16:32 IST2025-11-13T16:29:15+5:302025-11-13T16:32:08+5:30
भाजप ३५ पेक्षा अधिक जागांवर आग्रही

Kolhapur Municipal Election: महायुतीत संभ्रम कायम, स्वतंत्र लढण्याचीही तयारी जोरात; इच्छुकांसह नेतेही लागले कामाला
कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग निश्चित झाले, प्रभागावरील आरक्षणही जाहीर झाले. त्यामुळे आता इच्छुकांसह राजकीय पक्षाचे नेतेही कामाला लागले आहेत. निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने महायुती आघाडीत नेत्यांचा संवाद सुरू झाला असून, आपापल्या पक्षाकडून कोण कोण लढण्यास इच्छुक आहेत, त्यांच्या याद्या करण्याचे कामही सुरू झाले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडी होणार की नाही, याचा संभ्रम आजही कायम आहे. निवडणुकीसाठी आघाडी करायची किंवा स्वतंत्र लढायचे, याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात येणार आहे, असे सांगितले जात असताना गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या संभ्रमात अधिक भर पडली असल्याचे पाहायला मिळत आहे. तरीही स्वतंत्र लढण्याच्या तयारीनेच जोर बैठका सुरू झाल्या आहेत.
शिंदेसेनेच्या आग्रही भूमिकेने युतीत अस्वस्थता
एकत्र लढायचे की स्वतंत्र, याचा निर्णय केव्हा व्हायचा तेव्हा होऊ दे, शिंदेसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे स्वतंत्रपणे तयारी केली जात आहे. या तयारीत शिंदेसेना आघाडीवर आहे. गेल्या दोन महिन्यांत काँग्रेस, ताराराणी आघाडी, राष्ट्रवादी, भाजप या पक्षांतून अनेक माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपसह राष्ट्रवादी अजित पवार गटात अस्वस्थता आहे. आजच्या घडीला शिंदेसेनेकडे ६० ते ७० कार्यकर्ते निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. आपला प्रवेश झाला आहे म्हटल्यावर आपली उमेदवारी निश्चित आहे, असे समजून ते कामालाही लागले आहेत.
राष्ट्रवादीचे स्वतंत्र लढण्याचेही नियोजन
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने निवडून येऊ शकतील, अशा माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांची यादी तयार केली आहे. या यादीनुसार कोणी कोणत्या प्रवर्गातून तसेच प्रभागातून लढायचे यावर गेल्या दोन दिवसांपासून विचारविनिमय केला जात आहे. काही प्रभागांत नागरिकांचा मागास प्रवर्गातून लढण्याची इच्छा असताना महिला आरक्षण पडल्याने काही माजी नगरसेवकांना नाराज असल्याचे दिसते. त्यामुळे त्यांनी आता सर्वसाधारण प्रवर्गातून लढण्याचा आग्रह पक्षाकडे धरला आहे. यातून मार्ग कसा काढायचा, यावर चर्चा केली जात आहे. राष्ट्रवादीने महायुती झाली तर ठीक नाही झाली तर स्वतंत्र लढण्याचेही नियोजन केले आहे.
भाजप ३५ पेक्षा अधिक जागांवर आग्रही
भाजपचे स्थानिक नेत्यांनी महापालिकेसाठी ३५च्या वर जागांसाठी आग्रह धरला आहे. भाजप-ताराराणी आघाडीने मागच्या सभागृहात ३३ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ३५ पेक्षा कमी जागा घ्यायच्या नाहीत, असा निर्धार केला आहे. भाजप पक्षांतर्गत इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. पक्षाची कोअर कमिटी उमेदवारांची यादी निश्चित करणार आहेत. या कमिटीत मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, महेश जाधव, विजय जाधव यांचा समावेश आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार ठरविण्याचे अधिकार आमदार अमल महाडिक यांना असतील, असेही सांगण्यात येते.