Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत भाजप-शिंदेसेना युतीचं जमलं, ५४-११ चा फॉर्म्युला निश्चित; राष्ट्रवादी गुलदस्त्यातच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 18:22 IST2025-12-29T17:53:01+5:302025-12-29T18:22:33+5:30
उमेदवारी न मिळालेले काही बूथप्रमुख सामूहिक राजीनाम्याचे अस्त्र उचलणार

Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत भाजप-शिंदेसेना युतीचं जमलं, ५४-११ चा फॉर्म्युला निश्चित; राष्ट्रवादी गुलदस्त्यातच
इचलकरंजी : महानगरपालिकेसाठी भाजपचे उमेदवार निश्चित करण्यासाठी कोल्हापूर येथे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत किरकोळ फेरबदल करण्यात आले. त्याचबरोबर शिंदेसेनेसोबत युती करण्याचेही निश्चित झाले असून, त्यामध्ये ५४ जागा भारतीय जनता पार्टीला आणि ११ जागा शिंदेसेनेला देण्यावर एकमत झाल्याचे समजते.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भाजपच्या उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर निश्चित केलेल्या उमेदवारांना तयारीला लागण्याच्या सूचनाही येथील भाजप कार्यालयाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, यामध्ये अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप झाला होता. याची दखल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन या यादीला स्थगिती दिली होती.
वाचा : शिव-शाहू आघाडीला धक्का; आप, स्वाभिमानी पक्षानंतर उद्धवसेनाही पडली बाहेर
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मंत्री पाटील यांनी रविवारी कोल्हापुरात बैठक घेऊन अंतिम उमेदवारी यादी निश्चित केली. त्यासाठी संघटनमंत्री मकरंद देशपांडे, आमदार राहुल आवाडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीत दीड तासांहून अधिक काळ चर्चा झाली. चर्चेअंती दोन ठिकाणी किरकोळ बदल करण्याचा निर्णय झाला असल्याचे समजते.
तसेच जे निष्ठावंत महानगरपालिका निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत, त्यांना स्वीकृत करण्यासंदर्भात आश्वासन देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीनंतर आता इच्छुक असलेले कार्यकर्ते कोणता निर्णय घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी पक्षाने अद्याप त्यांची भूमिका गुलदस्त्यातच ठेवली आहे.
बंडखोरी टाळण्यासाठी गोपनीयता
निश्चित झालेल्या उमेदवारांना भाजपकडून बी फॉर्म देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. परंतु, यादीमध्ये नेमके कोणते बदल झाले, याबाबत गोपनीयता पाळण्यात आली आहे. पहिली यादी बाहेर पडल्यानेच बंडखोरी तसेच नाराजीचा सामना करावा लागल्याने रविवारी कोल्हापुरात झालेल्या बैठकीचा वृत्तांत बाहेर पडण्यापासून रोखण्यात आला.
सामूहिक राजीनाम्याचे अस्त्र
पक्षश्रेष्ठींकडून माहिती बाहेर पडली नसली तरी महायुतीमधील राजकीय घडामोडी रविवारीही सुरूच होत्या. उमेदवारी न मिळालेले काही बूथप्रमुख सामूहिक राजीनाम्याचे अस्त्र उचलणार आहेत. सोमवारी शिवतीर्थाजवळ येऊन राजीनामा देण्याची शक्यता आहे.