उमेदवार जाहीर होताच ठाकरे गटात राजकीय भूकंप? स्थानिक आगरी भूमीपुत्राला उमेदवारी देण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 15:21 IST2024-04-04T15:19:49+5:302024-04-04T15:21:01+5:30
Uddhav Thackeray, Kalyan Lok Sabha Election 2024: दरेकर यांच्या उमेदवारीला ठाकरे गटातूनच विरोध होत असल्याची माहिती 'लोकमत'शी बोलताना एका पदाधिकाऱ्याने दिली

उमेदवार जाहीर होताच ठाकरे गटात राजकीय भूकंप? स्थानिक आगरी भूमीपुत्राला उमेदवारी देण्याची मागणी
Uddhav Thackeray, Kalyan Lok Sabha Election 2024: मयुरी चव्हाण काकडे, लोकमत न्यूज नेटवर्क: उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत कल्याण लोकसभेतून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर केली, मात्र ही उमेदवारी जाहीर करून २४ तास उलटत नाहीत तोच ठाकरे गटात अंतर्गत कलह सुरू झाला आहे. दरेकर यांच्या उमेदवारीला मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटातूनच विरोध होत असल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. इतकेच नाही तर 'लोकमत'शी बोलताना या वृत्ताला ठाकरे गटातूनच दुजोरासुद्धा देण्यात आला आहे. स्थानिक आगरी भूमीपुत्राला उमेदवारी द्यावी, असा आग्रह ठाकरे गटातून होत असून अनेकांनी राजीनामा देण्याचा इशाराही दिला आहे.
बुधवारी वैशाली दरेकर यांच्या नावाची घोषणा झाली मात्र ठाकरे गटात 'कही खुशी कही गम' असं वातावरण पाहायला मिळालं. या उमेदवारीबद्दल दबक्या आवाजात चर्चा सुरू असतानाच गुरुवारी महिला आघाडी, युवा सेना व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने माजी आमदार सुभाष भोईर यांच्या शीळ या निवासस्थानी जमले होते. मलंगगड, अंबरनाथ, कल्याण ग्रामीण, डोंबिवली, कळवा-मुंब्रा येथील अनेक महिला पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा सैनिक यांनी उमेदवारीला आक्षेप घेत राजीनाम्याचा इशारा दिला आहे असल्याचे सांगितले जात आहे.
या संदर्भात माहिती देताना नाव न छापण्याच्या अटीवर एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला विश्वासात न घेता ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच, आम्ही या उमेदवारावर विश्वास ठेवू शकत नाही, असेही धक्कादायक विधानही त्या पदाधिकाऱ्याकडून करण्यात आले आहे. आम्हाला आगरी समाजाचा कट्टर शिवसैनिक उमेदवार पाहिजे आणि तशी मागणी आम्ही पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. जर हारण्यासाठीच ही उमेदवारी असेल तर आम्ही काम का करायचे? केसेस का अंगावर घ्यायच्या? असा सवालही या पदाधिकाऱ्याने उपस्थित केला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. कारण खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासारखा उमेदवार असताना आता निवडणूकीच्या तोंडावर ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्येच उमेदवारीवरून मोठा कलह निर्माण झाला आहे. त्यातच भोईर यांच्या निवासस्थानी गेलेल्या पदाधिकाऱ्यांना भोईर यांनी काय सल्ला दिला किंवा काय मत मांडले हा देखील एक मोठा 'सस्पेंस' आहे.