चोर समजून लघुशंकेला थांबलेल्या तरुणाला मारहाण; रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 20:58 IST2023-07-01T20:57:17+5:302023-07-01T20:58:05+5:30

विजय कैलास खरे हा आपल्या मित्राला सोडण्यासाठी समृध्दी महामार्गावरून थार येथे गेला होता.

A young man was beaten up as a thief in Nandapur | चोर समजून लघुशंकेला थांबलेल्या तरुणाला मारहाण; रुग्णालयात दाखल

चोर समजून लघुशंकेला थांबलेल्या तरुणाला मारहाण; रुग्णालयात दाखल

जालना : मित्राला सोडण्यासाठी दुचाकीवरून गेलेल्या एका तरुणाला चोर समजून ग्रामस्थांनी बेदम मारहाण केल्याची घटना जालना तालुक्यातील नंदापूर शिवारात शुक्रवारी रात्री उशिरा घडली. विजय कैलास खरे (३२, रा. कन्हैय्यानगर, जालना) असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

विजय कैलास खरे हा आपल्या मित्राला सोडण्यासाठी समृध्दी महामार्गावरून थार येथे गेला होता. मित्राला सोडून परत येत असताना तो नंदापूर शिवारात पुलाखाली दुचाकी उभी लघूशंकेसाठी थांबला होता. तेव्हा गावातील काही तरुण तिथे आले. नंदापूर शिवारात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्यामुळे सदर तरुण चोर असावा, अशी शंका आल्याने काही तरुणांनी त्याला पकडून गावात आणले. तेव्हा मोठा जमाव एकत्र आला. विजय खरे या तरुणाला चोर समजून ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली. सदर तरुण कन्हैय्यानगरचा आहे, असे सांगत असतानाही ग्रामस्थांनी त्याला मारहाण करणे सुरूच ठेवले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच तालुका ठाण्याचे बीट जमादार उदलसिंग जारवाल, नितीन झोटे हे नंदापूर गावात पोहचले. पोलिसांनी जखमी विजय खरे याची ग्रामस्थांच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सदर तरुणाचा जबाब नोंदविण्यात आल्याची माहिती बीट जमादार जारवाल यांनी दिली. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कुठल्याही गुन्ह्याची नोंद नव्हती.

Web Title: A young man was beaten up as a thief in Nandapur