Hollywood film 'The Warrior Queen of Jhansi' will be release soon | मराठीसोबत हॉलिवूडमध्येही प्रदर्शित होणार 'दि वॉरियर क्वीन ऑफ झांसी’
मराठीसोबत हॉलिवूडमध्येही प्रदर्शित होणार 'दि वॉरियर क्वीन ऑफ झांसी’

थोर कर्तृत्व आणि नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा संपूर्ण जगाच्या इतिहासावर उमटविला. आजही त्यांची थोरवी, त्यांचे शूरत्व अनेक कथा, कादंबऱ्यांमधून उजळवले जाते. अशा या धाडसी आणि पराक्रमी स्त्रीच्या शौर्याची गाथा संपूर्ण जगाला कळावी, यासाठी दिग्दर्शिका स्वाती भिसे घेऊन येत आहेत 'दि वॉरियर क्वीन ऑफ झांसी’. या चित्रपटाचे मुख्य वैशिष्ट्य  म्हणजे हा सिनेमा मराठी आणि इंग्लिश भाषेत प्रदर्शित होणार आहे.                'दि वॉरियर क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वाती भिसे यांनी केले असून, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांची मुख्य भूमिका देविका भिसे साकारत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने एक आई तिच्या लेकीला दिग्दर्शित करताना दिसणार आहे.  आई दिग्दर्शक आणि मुलगी मुख्य अभिनेत्री असे समीकरण फार  क्वचितच पाहायला मिळते. याबद्दल देविका सांगते, " असे म्हणतात आई हा आपला पहिला गुरु असतो. माझी आई सुद्धा माझा पहिला गुरु आहे,  शिवाय ती माझी भरतनाट्यम गुरु देखील आहे. मला जेव्हा समजले की, आई ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे, तेव्हा मी खूप उत्सुक होते, तेवढेच दडपण सुद्धा आले होते. मात्र जेव्हा मी सेटवर गेले आणि तिच्यासोबत काम करायला सुरुवात केली तेव्हा एक नवीनच आई मला दिसली. आई जशी घरी असते तशी ती सेटवर बिलकुल नव्हती.  माझी आई घरी खूप कडक आहे.  अगदी याउलट ती सेटवर मला दिसली. मजा मस्ती करणारी, सेटवरच वातावरण खेळीमेळीचे ठेवणारी, सगळ्यांची काळजी घेणारी एकंदरीत एक वेगळीच आई मला तिथे दिसली. जेव्हा आम्ही शूटिंगला सुरुवात केली, तेव्हा मला जाणवले की, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्यामध्ये एक समजुदारपणा आणि विश्वास असावा लागतो. एक कलाकार म्हणून तिने मला पूर्ण मोकळीक दिली होती. कधीही न विसरता येणाऱ्या अनेक गोष्टी मी आईकडून शिकले. तिला विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी सेटवर होत्या परंतु तिने कधीही त्याचा परिमाण स्वतःवर होऊ दिला नाही."


         तर याबद्दल स्वाती भिसे सांगतात, " देविका एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. हे मत मी एक दिग्दर्शका म्हणून मांडत आहे. प्रत्यक्षात आमच्यात आई मुलीचे नाते असले तरी सेटवर मात्र आम्ही दिग्दर्शक आणि कलाकार म्हणूनच वावरत होतो. देविकाचे बरचसं शिक्षण हे भारताबाहेर झाल्याने, मला देविकाकडून  अस्खलित मराठी उच्चार अपेक्षित होते, आणि हे काम देविकाच्या आजीने अगदी लीलया पार पाडले. व्यक्तिमत्वात आणि बोलण्यात मराठीपण दिसावे यासाठी माझ्या आईने तिला खूप मदत केली.


आई असल्याने देविकाच्या जमेच्या बाजू मला माहित होत्या आणि ती कशात कमी आहे हे देखील मला माहित होते. त्यामुळेच तिच्याकडून उत्तम अभिनय करून घेणे मला शक्य झाले.  


     'दि वॉरियर क्वीन ऑफ झांसी’ चित्रपट अशा स्त्रीची यशोगाथा सांगतो, जिच्या नुसत्या नावाने इंग्रजांच्या मनात धास्ती निर्माण व्हायची. स्वाती भिसे दिग्दर्शित, केयेन पेपर प्रॉडक्शन निर्मित आणि पीव्हीआर पिक्चर्सचा  हा सिनेमा येत्या २९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

English summary :
The Warrior Queen of Jhansi Movie : Director Swati bhise is coming to the world to tell the brave story of Jhansi queen through 'The Warrior Queen of Jhansi' movie. The main feature of this movie is that the movie will be released in Marathi and English.


Web Title: Hollywood film 'The Warrior Queen of Jhansi' will be release soon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.