"जाहीर माफी माग कपिल शर्मा, नाहीतर..." खलिस्तान समर्थक हरजीत सिंगची कॉमेडियनला धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 14:16 IST2025-07-11T14:16:03+5:302025-07-11T14:16:24+5:30

कपिल शर्माने जाहीर माफी मागावी अशी त्याची मागणी आहे. माफी न मागितल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशाराच दिला आहे.

Why Babbar Khalsa Shot At Kapil Sharma’s Café In Canada | Apology Controversy Explained | "जाहीर माफी माग कपिल शर्मा, नाहीतर..." खलिस्तान समर्थक हरजीत सिंगची कॉमेडियनला धमकी!

"जाहीर माफी माग कपिल शर्मा, नाहीतर..." खलिस्तान समर्थक हरजीत सिंगची कॉमेडियनला धमकी!

Kapil Sharma's Cafe In Canada Targeted In Shooting: प्रसिद्ध विनोदी अभिनेता कपिल शर्मा याच्या कॅनडात नुकत्याच सुरू झालेल्या 'कॅप्स कॅफे'वर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे शहरात हा 'कॅप्स कॅफे' होता. पिस्तूलमधून एकूण ९ गोळ्या झाडण्यात आल्याचे समोर आले आहे. जर्मनीस्थित बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) या दहशतवादी संघटनेचा सदस्य हरजीत सिंग लड्डीने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. कपिल शर्माने एका विनोदी कार्यक्रमात निहंग शिखांच्या पोशाखावर केलेल्या टिप्पणीमुळे हा वाद थेट हिंसक टप्प्यावर पोहचला आहे. कपिल शर्माने जाहीर माफी मागावी अशी त्याची मागणी आहे.

 सरे पोलिस सर्व्हिस (SPS) च्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे १:५० वाजता त्यांच्या नियंत्रण कक्षात गोळीबाराची माहिती आली, त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले.  या घटनेत सुदैवाने कोणी जखमी झाले नाही, मात्र कपिल शर्माच्या संपत्तीचे नुकसान मात्र झाले आहे. कॅनेडियन पत्रकार डॅनियल बोर्डमन यांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं, "कॅनडातील ही परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. खलिस्तानी हिंसाचार मागील काही वर्षांत वाढला असून, हे अतिरेकाचं एक नवं स्वरूप आहे. ही फक्त एक कॅफेवरची गोळीबाराची घटना नाही, तर प्रसिद्ध भारतीय कलाकारावर झालेला थेट हल्ला आहे".

कपिलच्या कॅफेवर का केला हल्ला?

कपिलच्या शोमध्ये निहंग शिखांच्या पोशाखाबद्दल काही आक्षेपार्ह भाष्य केल्याचा आरोप या संघटनेने केला आहे. त्यामुळे हा हल्ला केल्याचे समोर आले. बब्बर खालसाकडून सोशल मीडिया पोस्ट करण्यात आली आहे. ज्यामध्ये म्हटलंय, "कपिल शर्माच्या कॉमेडी शोच्या एका भागात एका पात्राने निहंग शीखांचा पोशाख किंवा वर्तनाबद्दल काही विनोदी टिप्पणी केली. आम्ही कपिल शर्माशी अनेक वेळा फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आमच्या सर्व कॉलकडे दुर्लक्ष करण्यात आले. जर कपिल शर्माने जाहीर माफी मागितली नाही तर...', सा इशाराच या पोस्टमध्ये देण्यात आला आहे. त्याच्या या धमकीमुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.

कपिल शर्माच्या कॉमेडी शोतील एका विनोदी संवादामुळे निर्माण झालेला वाद आता थेट गोळीबारासारख्या गंभीर टप्प्यावर पोहोचला आहे. हा प्रकार केवळ कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच नव्हे, तर सामाजिक शांततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.

हरजीत सिंग लड्डी कोण?
कॅनडामधील कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेवर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेतल्यानंतर एनआयएचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हरजीत सिंग उर्फ लड्डी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खलिस्तान समर्थक असलेला हरजीत सिंग बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) या दहशतवादी संघटनेशी संबंधित असून, तो सध्या जर्मनीमध्ये वास्तव्यास आहे. हरजीत सिंगचा जन्म पंजाबमधील नवांशहर जिल्ह्यातील गारपधाना गावात झाला आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून खलिस्तान चळवळीत सक्रीय आहे. भारताच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) त्याला फरार दहशतवादी घोषित केले असून, त्याच्या अटकेसाठी १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. 

एनआयएच्या तपासानुसार, हरजीत सिंग केवळ एक अतिरेकी नाही, तर दहशतवादी कारवायांचा सूत्रधार आणि फंडिंगचा प्रमुख घटक आहे. त्याचे पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ISI सोबतही संबंध असल्याचं स्पष्ट झालं आहे. तो पाकिस्तानस्थित बब्बर खालसाचे प्रमुख वाधवा सिंग बब्बर याच्यासोबत थेट संपर्कात असून, जागतिक पातळीवरील दहशतवादी नेटवर्क हाताळतो.

Web Title: Why Babbar Khalsa Shot At Kapil Sharma’s Café In Canada | Apology Controversy Explained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.