"माझ्या मुलावर कोण कशासाठी सट्टा लावेल?", बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सला लॉन्च करण्यावर अरशद वारसीचं परखड मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 12:25 IST2025-12-01T12:24:27+5:302025-12-01T12:25:29+5:30
Arshad Warsi : बॉलिवूडमध्ये फक्त स्टारकिड्सला कामं मिळतात, असं वारंवार ऐकायला मिळतं, यावर नुकतेच एका मुलाखतीत अर्शद वारसीने आपलं मत व्यक्त केलंय.

"माझ्या मुलावर कोण कशासाठी सट्टा लावेल?", बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सला लॉन्च करण्यावर अरशद वारसीचं परखड मत
बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे अर्शद वारसी (Arshad Warsi). अभिनेत्याने आपल्या कारकिर्दीत अनेक मोठ्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'गोलमाल', 'मुन्नाभाई एमबीबीएस', 'धमाल', 'जॉली एलएलबी' यांसारख्या हिट कॉमेडी फ्रँचायझींमध्ये अर्शद वारसीचे मोठे योगदान आहे. त्याच्या 'कॉमिक टाइमिंग'चे सगळेच चाहते आहेत. गेल्या २५ वर्षांपासून अर्शद बॉलिवूडचा भाग आहे. या काळात त्याने अनेक मोठे चित्रपट निर्माते आणि स्टार्ससोबत काम केले आहे. इंडस्ट्रीत त्याची सर्वांशी चांगली ओळख आहे. पण अर्शदचे ठाम मत आहे की, ते आपल्या मुलांना काम मिळवून देण्यासाठी कोणत्याही चित्रपट निर्मात्याकडे विनंती करणार नाही.
बॉलिवूडमध्ये फक्त स्टारकिड्सला कामं मिळतात, असं वारंवार ऐकायला मिळतं, यावर नुकतेच एका मुलाखतीत अर्शद वारसीने आपलं मत व्यक्त केलंय. बॉलिवूड हंगामाशी बोलताना अभिनेता म्हणाला की, ''माझा मुलगा आणि मुलगी दोघांनाही अभिनयात रस आहे. माझा मुलगा सध्या सिद्धार्थ आनंदच्या 'किंग'मध्ये सहायक म्हणून काम करत आहे आणि त्याने राजकुमार हिराणी यांनाही असिस्ट केले आहे. अर्थात मला भीती वाटत आहे, कारण आजकाल हे एक कठीण काम आहे. अभिनय करणे हा आता सोप्पे प्रोफेशन राहिलेले नाही, कारण यात यश मिळवण्याची संधी खूप कमी आहे.''
''इथे कोणी कोणाला मदत करू शकत नाही''
अर्शद वारसीने पुढे इंडस्ट्रीत यश मिळवण्याबद्दल सांगितले, ''इथे कोणी कोणाला मदत करू शकत नाही. तुम्हाला तुमचा मार्ग स्वतःच शोधावा लागेल. मी कोणत्याही दिग्दर्शकाला फोन करून माझ्या मुलांवर शेकडो कोटी रुपये लावण्याची विनंती करू शकत नाही. माझ्या मुलावर कोण कशासाठी सट्टा लावेल? एखाद्या चित्रपट निर्मात्याला माझ्या मुला-मुलींना भेटण्यासाठी एक साधा कॉल करणे म्हणजे त्यांनी माझ्या मुलांना त्यांच्या प्रोजेक्टमध्ये घ्यावे, जे मी करणार नाही. कोणी असे का करेल? जर मी त्यांना तसे करण्यास सांगितले, तर ते चित्रपट निर्माते माझ्या मुलांवर पैज का लावतील? मी माझ्या मुलांची शिफारस कोणाकडे का करू?''
वर्कफ्रंट
अरशद वारसी शेवटचा 'जॉली एलएलबी ३' चित्रपटात पाहायला मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला बिझनेस केला. हा त्याच्या हिट चित्रपट 'जॉली एलएलबी'चा सीक्वल होता. आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचं तर ज्या चित्रपटात अर्शद वारसीचा मुलगा सहाय्यक म्हणून काम करत आहे, त्याच चित्रपटात अभिनेत्याची एक महत्त्वाची भूमिका आहे. अरशद शाहरुख खान अभिनित 'किंग'मध्ये दिसणार आहेत, ज्याच्या शूटिंगसाठी तो पोलंडलाही गेला होता. अभिनेत्याने तिथून आपला फोटो पोस्ट करून चाहत्यांना याबाबत हिंट दिली होती.