The Family Man 4: मनोज वाजपेयीच्या 'द फॅमिली मॅन'चा चौथा सीझन येणार भेटीला, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 15:46 IST2025-11-22T15:46:09+5:302025-11-22T15:46:56+5:30
The Family Man 4: 'द फॅमिली मॅन'चा तिसरा सीझन नुकताच रिलीज झाला आहे. त्यानंतर आता चाहते या सीरिजच्या चौथ्या सीझनबाबत उत्सुक आहेत.

The Family Man 4: मनोज वाजपेयीच्या 'द फॅमिली मॅन'चा चौथा सीझन येणार भेटीला, जाणून घ्या याबद्दल
अभिनेता मनोज वाजपेयीचा 'द फॅमिली मॅन ३' या शुक्रवारी ओटीटीवर रिलीज झाला. या सीरिजला प्रेक्षक आणि समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चाहते तिसऱ्या सीझनचे खूप कौतुक करत आहेत. या सीझनमध्ये मनोज वाजपेयी, प्रियामणी, शारिब हाश्मी, अश्लेषा ठाकूर, वेदांत सिन्हा, जयदीप अहलावत, निम्रत कौर, श्रेया धन्वंतरी आणि इतर कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
राज आणि डीके दिग्दर्शित 'द फॅमिली मॅन ३' एका उत्सुकता वाढवणाऱ्या वळणावर संपतो, ज्यानंतर चाहते या सीरिजचा चौथा सीझन कधी येणार आहे, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. मिड-डेच्या एका रिपोर्टनुसार, निर्माते राज निदिमोरु आणि दिग्दर्शक डीके हे मनोज वाजपेयीच्या स्पाय थ्रिलर सीरिजच्या चौथ्या सीझनची योजना आखत आहेत. हा चौथा सीझन या मालिकेचा शेवटचा सीझन असेल, असे सांगितले जात आहे आणि तो सीझन ३ मध्ये अनुत्तरित राहिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईल. मात्र शोच्या निर्मात्यांनी याबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी दिलेली नाही.
'द फॅमिली मॅन ४' कधी रिलीज होईल?
रिपोर्ट्सनुसार, सीझन ४चे लेखन सुरू आहे आणि त्याचे चित्रीकरण २०२६ च्या मध्यभागी सुरू होण्याची शक्यता आहे. आतापर्यंतची रिलीज टाइमलाइन पाहिल्यास, 'द फॅमिली मॅन'चा सीझन १ २०१९ मध्ये आला, सीझन २ २०२१ मध्ये आला आणि सीझन ३ नोव्हेंबर २०२५ मध्ये आला आहे. ही सीरिज मोठ्या प्रोडक्शन गॅपनंतर भेटीला आली आहे. जर प्राइम व्हिडीओने पुढील भागाला मंजुरी दिली, तर 'द फॅमिली मॅन'चा चौथा सीझन २०२८ च्या आसपास येऊ शकतो.