'टाटा' ब्रँडमागची कहाणी! नसीरुद्दीन शाहांसोबत झळकला वैभव तत्ववादी, 'मेड इन इंडिया: द टायटन स्टोरी'चा टीझर समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 11:46 IST2025-09-26T11:44:12+5:302025-09-26T11:46:12+5:30
सध्याची बहुचर्चित वेबसीरिज 'मेड इन इंडिया: द टायटन स्टोरी'चा टीझर समोर आलाय. मराठमोळा वैभव तत्ववादी सीरिजमध्ये खास भूमिका साकारत आहे

'टाटा' ब्रँडमागची कहाणी! नसीरुद्दीन शाहांसोबत झळकला वैभव तत्ववादी, 'मेड इन इंडिया: द टायटन स्टोरी'चा टीझर समोर
जगभरात 'मेड इन इंडिया' उत्पादनाची ओळख निर्माण करणाऱ्या आणि भारतीयांच्या अनेक पिढ्यांसाठी महत्त्वाच्या ठरलेल्या टायटन (Titan) घड्याळाच्या निर्मितीची अनोखी आणि प्रेरणादायी कहाणी आता प्रेक्षकांसमोर येणार आहे. 'मेड इन इंडिया: टायटन स्टोरी' या आगामी वेब सीरिजचा पहिला लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या वेबसीरिजमध्ये टाटा समूहाच्या (Tata Group) एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची आणि जागतिक बाजारपेठेत 'टायटन'ने आपलं स्थान कसं निर्माण केलं, याची संपूर्ण कहाणी सांगण्यात येणार आहे.
टायटनच्या यशाची कहाणी
ही सीरिज टायटन कंपनीच्या स्थापनेपासून ते तिच्या यशापर्यंतचा प्रवास दाखवणार आहे. १९८४ मध्ये टाटा समूहाने भारतातील पहिली घड्याळ कंपनी 'टायटन'ची स्थापना कशी केली आणि १९८७ मध्ये ही कंपनी बाजारात कशी लॉन्च झाली, हा प्रवास यात दाखवला जाईल. टाटा समूहाचे तत्कालीन चेअरमन जेरेक्सेस देसाई यांना ही जबाबदारी कशी देण्यात आली, तसेच तामिळनाडू सरकारसोबत केलेला करार आणि टाटा समूहाने टायटनमधून रोजगार निर्मिती कशी केली, याची प्रेरणादायी कहाणी या सीरिजमधून दिसणार आहे.
कधी रिलीज होणार वेबसीरिज
या सीरिजमध्ये ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह आणि जिम सरभ यांच्यासह मराठमोळा अभिनेता वैभव तत्ववादी महत्वपूर्ण भूमिकेत आहे. नसीरुद्दीन शाह यांनी जे. आर. डी. टाटांची भूमिका साकारली असून जिम सरभ जेरेक्सेस देसाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय नमिता दुबे, परेश गंत्रा, कावेरी सिंग आणि लक्ष्वीर शरण यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'मेड इन इंडिया: टायटन स्टोरी' ही वेब सीरिज पुढील वर्षी २०२६ मध्ये अमेझॉन एमएक्स प्लेयरवर रिलीज होण्याची शक्यता आहे. टायटन घड्याळाचा हा गौरवशाली इतिहास पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.