"सत्याने प्रेरीत पण...", 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 18:27 IST2025-10-11T18:26:41+5:302025-10-11T18:27:06+5:30
Aryan Khan : माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' सीरिजवर मानहानीचा दावा केला आहे. दरम्यान आता या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर किंग खानचा लाडला आर्यन खानने या प्रकरणावर मौन सोडले आहे.

"सत्याने प्रेरीत पण...", 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...
बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून पदार्पण केलं आहे. त्याने नेटफ्लिक्सच्या या सीरिजमधून दिग्दर्शनाच्या जगात पाऊल टाकलं आहे. आर्यन खानच्या वेबसीरिज 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'ला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे. मात्र अद्याप या सीरिजवरील वाद अजून संपायचे नाव घेत नाही. माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी आर्यन खानच्या सीरिजवर मानहानीचा दावा केला आहे. दरम्यान आता या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर किंग खानचा लाडला आर्यन खानने या प्रकरणावर मौन सोडले आहे.
व्हरायटीशी बोलताना आर्यन खानने या प्रकरणावर भाष्य केले आहे. तो म्हणाला की, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' या सीरिजमधील काही घटना वास्तविक घटनांवरून प्रेरित आहेत, परंतु त्यामागे कोणाचाही अपमान करण्याचा उद्देश नव्हता. आर्यन खानने हे स्पष्टीकरण अशा वेळी दिले आहे, जेव्हा या सीरिजवरून वाद वाढत आहे. समीर वानखेडे यांनी 'रेड चिलीज एंटरटेनमेंट' आणि 'नेटफ्लिक्स' विरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला आहे. वानखेडे यांचा दावा आहे की, या सीरिजमधील एक पात्र त्यांची बदनामी करत आहे, ज्यामुळे त्यांची प्रतिष्ठा खराब होत आहे आणि कायदा लागू करणाऱ्या यंत्रणांवरील जनतेचा विश्वास कमी होत आहे.
'डार्क ह्युमर' आहे 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'
या प्रकरणाबद्दल बोलताना आर्यन खान म्हणाला की, त्याच्या टीमला बॉलिवूडची 'डार्क साईड' पडद्यावर दाखवायची होती. ग्लॅमर आणि प्रसिद्धीच्या दुनियेतील ही न पाहिलेली बाजू त्यांना डार्क ह्युमरच्या स्वरूपात सादर करायची होती. आर्यन खान पुढे म्हणाला की, त्याला इंडस्ट्री आणि येथील 'इनसायडर्स'वर उपरोध करायचा होता, पण कोणाबद्दलही असंवेदनशील व्हायचं नव्हतं किंवा कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. आर्यन खानच्या म्हणण्यानुसार, त्याला आपल्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' या सीरिजमधून कोणाचाही अपमान करायचा नव्हता.
"डॉक्युमेंट्री नसल्यामुळे, यात..."
आर्यन खान पुढे म्हणाला की, "या इंडस्ट्रीत असण्याची खास गोष्ट ही आहे की, तुम्हाला स्वतःचीच थट्टा करायला जमली पाहिजे. जर तुम्ही स्वतःची थट्टा करू शकत असाल, तरच तुम्ही इतरांना तुमच्या विनोदी शैलीने हसवू शकाल." त्याने सांगितले की, काही सीन्सवर वाद झाले होते. तो म्हणाला, "आम्हाला काही सीन्सवर नोट्स मिळाल्या, जिथे लोक म्हणत होते, 'ओह, हे खूप असं आहे, किंवा हे खूप तसं आहे.' पण, मग मी एक भूमिका घेतली. जर तुम्हाला हे आवडले नाही, तर माझा अर्थ आहे, हा शो तुमच्यासाठी नाही... तुमचे १८ वर्षांचे मूल किंवा तुमच्या विनोदी शैलीचा आनंद घेणारे तुमचे काका यांना तो नक्कीच आवडू शकतो." त्याने पुढे स्पष्ट केले की, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये विनोद आणि उपरोध यांचे मिश्रण आहे. हा एक कॉमेडी शो असल्यामुळे, डॉक्युमेंट्री नसल्यामुळे यात गोष्टी थोड्या अतिरंजीत करून दाखवण्यात आल्या आहेत.