कुणाल खेमूच्या 'सिंगल पापा' सीझन २ ची नेटफ्लिक्सकडून अधिकृत घोषणा, कधी प्रदर्शित होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 11:57 IST2026-01-06T11:54:47+5:302026-01-06T11:57:23+5:30
लवकरच गेहलोत कुटुंब पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कुणाल खेमूच्या 'सिंगल पापा' सीझन २ ची नेटफ्लिक्सकडून अधिकृत घोषणा, कधी प्रदर्शित होणार?
Single Papa Season 2 : बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक कुणाल खेमू याची 'सिंगल पापा' ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरली होती. आता या सीरिजच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नेटफ्लिक्सने अधिकृतपणे 'सिंगल पापा सीझन २'ची अधिकृत घोषणा केली आहे. लवकरच गेहलोत कुटुंब पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'सिंगल पापा'मध्ये कुणाल खेमूसोबतच प्राजक्ता कोळी, मनोज पाहवा, आयेशा रझा, नेहा धुपिया, सुहेल नय्यर, दयानंद शेट्टी, आयेशा अहमद आणि ईशा तलवार हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'सिंगल पापा' सीझन २'च्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र लवकरच याचे शुटिंग सुरू होण्याची शक्यता आहे.
काय आहे वेबसीरिजची कथा?
'सिंगल पापा' ही वेबसीरिज एका अशा व्यक्तीची आहे, जो अचानक एका महत्त्वाच्या जबाबदारीसाठी तयार होतो. ही जबाबदारी पेलण्यासाठी तो हळूहळू स्वतःमध्ये अनेक बदल घडवून आणतो. या सीरिजमध्ये कुणाल खेमू हा गौरव गेहलोत हे पात्र साकारत आहे. जबाबदारीपासून दूर पळणाऱ्या गौरव गेहलोत याला एके दिवशी अचानक त्याच्या गाडीच्या मागच्या सीटवर एक लहान मूल सापडतं. गौरव त्या लहान मुलाच्या इतका प्रेमात पडतो की त्या बाळाला दत्तक घेण्याचं ठरवतो. गौरवच्या या निर्णयाने त्याचे कुटुंब आश्चर्यचकित होतं. तो दत्तक संस्थेच्या नियमांचे पालन करण्यास तयार असला तरी, तिथे काम करणाऱ्या श्रीमती नेहरा त्याला मूल देण्यास तयार नसतात. पण, शेवटी त्याचं प्रेम पाहून ते मुल त्याला दिलं जातं. या सीरिजला IMDb वर १० पैकी ८.२ रेटिंग मिळालं आहे. जर तुम्ही अद्याप पहिला सीझन पाहिला नसेल तर तो नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.