बँक दरोड्यावर आधारीत आहे ईशा कोप्पीकरची थरारक वेब सीरिज, 'सुरंगा' आता अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 15:59 IST2025-11-15T15:55:45+5:302025-11-15T15:59:15+5:30
'सुरंगा — एक थरारक तपासकथा' ज्यात ईशा कोप्पीकर मुख्य भूमिकेत आहे, आता अमेझॉन प्राइम व्हिडिओवर दमदार पुनरागमन करत आहे.

बँक दरोड्यावर आधारीत आहे ईशा कोप्पीकरची थरारक वेब सीरिज, 'सुरंगा' आता अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित
'सुरंगा — एक थरारक तपासकथा' ज्यात ईशा कोप्पीकर मुख्य भूमिकेत आहे, आता अमेझॉन प्राइम व्हिडिओवर दमदार पुनरागमन करत आहे. ही वेब सीरिज २०२२ मध्ये अतरंगी अॅपवर प्रदर्शित झाली होती आणि ती एका उच्चस्तरीय बँक दरोड्याच्या गुंतागुंतीच्या जगावर आधारित आहे, ज्याची कथा खरी घटनांवर प्रेरित आहे. या कथेत एक बारकाईने आखलेला प्लॅन गोंधळात बदलतो आणि तपास अधिकाऱ्याला संभ्रमात टाकतो, कारण प्रत्येक वळणासोबत रहस्य अधिक गडद होत जाते.
ईशा कोप्पीकर या मालिकेत दक्षायिनीची भूमिका साकारत आहे. दिल्लीतील एक डिप्टी बँक मॅनेजर. तिचं पात्र अनेक स्तरांनी भरलेलं असून तिचं नैतिक द्वंद्व आणि व्यक्तिमत्व ही कथा पुढे नेणारं केंद्रबिंदू आहे. ईशाने आपल्या अभिनयातून कोमलता आणि तीव्रता दोन्ही दाखवली असून त्यामुळे या थ्रिलरचा सस्पेन्स अधिक परिणामकारक झाला आहे. या वेबसीरिजच्या पुन्हा रिलीजबद्दल बोलताना ईशा म्हणाली, “सुरंगा आता प्राइम व्हिडिओवर उपलब्ध झाल्याबद्दल मी खूप उत्सुक आहे. जेव्हा ही मालिका प्रथम प्रदर्शित झाली, तेव्हा तिला ‘एज-ऑफ-द-सीट ड्रामा’ म्हटलं गेलं होतं. कंटेंट आणि प्रेक्षकांची आवड सतत बदलत आणि विकसित होत असते, आणि मला आजच्या प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहण्याची खूप उत्सुकता आहे.”
ईशा कोप्पीकरसोबत या मालिकेत राकेश बेदी, पियूष रणाडे, फ्रेडी दारुवाला, सचिन वर्मा, संजीव त्यागी, राहुल जैतली आणि अशोक कालरा यांच्यासारखे गुणी कलाकार झळकतात. आपल्या गुंतागुंतीच्या कथानक, प्रभावी अभिनय आणि आता अमेझॉन प्राइम व्हिडिओवरील नवीन उपलब्धतेमुळे, सुरंगा पुन्हा एकदा प्रेक्षकांना स्क्रीनला खिळवून ठेवण्याचं वचन देते.