मेरठच्या थरारक हत्याकांडावर येतंय सीरिज, पोस्टर पाहताच अंगावर येईल काटा! कधी-कुठे पाहाल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 11:38 IST2026-01-04T11:37:43+5:302026-01-04T11:38:24+5:30
ज्या घटनेने उत्तर प्रदेशसह संपूर्ण देश हादरला होता, त्या मेरठमधील हत्याकांडावर आधारित डॉक्यू-सीरिज येत आहे.

मेरठच्या थरारक हत्याकांडावर येतंय सीरिज, पोस्टर पाहताच अंगावर येईल काटा! कधी-कुठे पाहाल?
नवऱ्याचा मृतदेह ड्रममध्ये ठेवून काँक्रिट भरलं... ज्या घटनेने उत्तर प्रदेशसह संपूर्ण देश हादरला होता, त्या मेरठमधील हत्याकांडावर आधारित डॉक्यू-सीरिज येत आहे. या सीरिजचं पहिलं अधिकृत पोस्टर नुकतेच प्रदर्शित झालं असून रिलीज डेटही समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये मुस्कान हिने प्रियकर साहिलच्या मदतीने मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूतची हत्या केली होती. तसेच हत्या करून पतीच्या मृतदेहाचे १५ तुकडे केले आणि सिमेंटने भरलेल्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये ते लपवले होते.
मेरठच्या गाजलेल्या या थरारक घटनेवर आधारित या सीरिजला "Honeymoon se Hatya: Why Women Kill" असा टायटल देण्यात आलेलं आहे. ही सीरिज ५ भागांमध्ये विभागलेली असून ती हिंदी भाषेत उपलब्ध असेल. ही सीरिज ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ZEE5 ने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये निळा ड्रम आणि त्यातील सीमेंटमध्ये अडकलेला एक हात स्पष्टपणे दिसतो. यासोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे, "सगळं काही 'हॅपी एंडिंग'सारखं वाटत होतं, पण मग… तसं झालंच नाही".
कधी आणि कुठे पाहायची?
हा सीरिज ९ जानेवारी २०२६ रोजी ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ज्यांना सत्य घटनांवर आधारित चित्रपट किंवा सीरिज आवडतात, त्यांच्यासाठी हा एक वेगळा अनुभव असेल.
नवऱ्याचा मृतदेह ड्रममध्ये ठेवून काँक्रिट भरलं
मेरठच्या ब्रह्मपुरी भागातील रहिवासी सौरभ राजपूतनं २०१६ मध्ये त्याच्या घरापासून थोड्या अंतरावर राहणाऱ्या मुस्कान रस्तोगीसोबत प्रेमविवाह केला होता. कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता दोघांनीही लग्न केलं. २०१९ मध्ये मुस्काननं एका मुलीला जन्म दिला. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यानं सौरभचे त्याच्या पालकांशी मतभेद झाले होते. त्यानंतर तो शेजारच्या इंदिरा नगरमध्ये मुस्कानसोबत राहू लागला. त्यानंतर सौरभच्या अनुपस्थितीत मुस्कान आणि साहिल शुक्ला यांच्यात जवळीक निर्माण झाली. सौरभ दोन वर्षांपूर्वी कामासाठी लंडनला गेला होता. या काळात मुस्कान आणि साहिलमधील मैत्री आणखी वाढली. सौरभच्या पासपोर्टची मुदत संपणार होती आणि त्याच कामासाठी तो भारतात आला होता.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुस्कान आणि साहिलनं आधीच हत्येची संपूर्ण योजना आखली होती आणि त्यांनी चाकू आणि बेशुद्ध करण्याची औषधं देखील खरेदी केली होती. हत्येच्या रात्री, मुस्काननं सौरभच्या जेवणात बेशुद्ध होण्याचं औषध मिसळलं. त्यानंतर जेव्हा तो बेशुद्ध पडला तेव्हा साहिलनं सौरभचा हात धरला आणि मुस्काननं त्याच्यावर चाकूनं अनेक वार केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी मृतदेह बाथरूममध्ये नेला आणि त्याचे तीन तुकडे केले. पुरावा नष्ट करण्यासाठी घरातील खोली ब्लीचिंग पावडरनं धुतली. त्यानंतर मुस्काननं बाजारातून एक ड्रम आणि सिमेंट विकत घेतलं. त्यात शरीराचे सर्व भाग टाकून तो ड्रम सिमेंटनं भरला. या खून प्रकरणातील गुन्हेगार मुस्कान आणि साहिल सध्या तुरुंगात आहेत. शिक्षा सुनावल्यानंतर काही दिवसांनी, मुस्कान गर्भवती असल्याचे उघड झाले आणि आता तिने तुरुंगात बाळाला जन्म दिला आहे.