Heeramandi 2 Update: पुन्हा सजणार 'हिरामंडी'चा बाजार! नवाबांसाठी नाचणार नाहीत गणिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 15:31 IST2025-11-17T15:29:18+5:302025-11-17T15:31:18+5:30
Heeramandi 2 Update: 'हिरामंडी २' वेबसीरिजबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे, तसेच या सीरिजची कथा पुढे कशी सरकेल, याचाही खुलासा झाला आहे.

Heeramandi 2 Update: पुन्हा सजणार 'हिरामंडी'चा बाजार! नवाबांसाठी नाचणार नाहीत गणिका
संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी' या वेब सीरिजचा पहिला सीझन गेल्या वर्षी मे महिन्यात प्रदर्शित झाला होता आणि रुपेरी पडद्याप्रमाणेच ओटीटीच्या जगातही ही सीरिज येताच हिट झाली. अदिती राव हैदरी, मनीषा कोइराला, ऋचा चड्ढा, सोनाक्षी सिन्हा, फरीदा जलाल आणि शर्मिन सेहगल अभिनीत या सीरिजची कथा प्रेक्षकांना खूप आवडली होती. 'हिरामंडी'मध्ये गणिकांच्या भावनांपासून ते त्यांच्या जगातील कटू सत्यापर्यंतचे चित्रण प्रेक्षकांसमोर मांडले होते. याचा दुसरा भागही येणार, हे निर्मात्यांनी त्याच वेळी जाहीर केले होते. आता 'हिरामंडी-२' बद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे, तसेच या सीरिजची कथा पुढे कशी सरकेल, याचाही खुलासा झाला आहे.
'हिरामंडी २'वर निर्मात्यांनी काम सुरू केले आहे. नेटफ्लिक्सच्या 'हिरामंडी'च्या लेखकांपैकी एक असलेल्या विभू पुरी यांनी 'मिड डे'शी बोलताना सांगितले, "सध्या आम्ही सीरिजच्या लेखन स्तरावर आहोत आणि पात्रे व कथानकावर काम करत आहोत. आजची पिढी हा कॉन्सेप्ट समजू शकेल का, अशी शंका लोकांना होती, पण प्रेक्षकांनी 'हिरामंडी'च्या जगाला आपलेसे केले." विभू पुरी यांच्यापूर्वी खुद्द संजय लीला भन्साळी यांनीही 'हिरामंडी २'च्या कथेबद्दल सांगितले होते आणि त्याचबरोबर ही सीरिज किती मोठी जबाबदारी आहे, हे देखील सांगितले होते. भन्साळी यांनी 'व्हायरायटी'शी बोलताना म्हटले होते की, "एक सीरिज बनवण्यासाठी अनेक गोष्टी लागतात आणि यासाठी खरोखरच वेळ लागला. 'गंगूबाई' प्रदर्शित झाल्यानंतर, मी कोणत्याही ब्रेकशिवाय दररोज या सीरिजवर काम केले."
'हिरामंडी २'च्या कथानकात 'नवाब' नसणार?
'हिरामंडी'चा पहिला भाग सूडाच्या भावनेभोवती फिरतो. मल्लिका जान (मनीषा कोइराला) रेहानाला मारते आणि नंतर तिची मुलगी फरीदनला (सोनाक्षी सिन्हा) विकते. मोठी झाल्यावर, फरीदन हिरामंडीमध्ये आपला बदला घेण्यासाठी परत येते. तसेच, 'हिरामंडी'तील तवायफा (गणिका) नवाबांसमोर मुजरा करताना दिसतात. मात्र, आता दुसऱ्या सीझनच्या कथानकात 'हिरामंडी'तील वेश्या 'नवाबां'साठी नाचणार नाहीत.
भन्साळी यांनी याच मुलाखतीत हे देखील सांगितले होते, "'हिरामंडी २'मध्ये लाहोरमधून बाहेर पडून महिला चित्रपटसृष्टीत कशा दाखल होतात, हे दाखवले जाईल. फाळणीनंतर त्यापैकी बहुतांश लाहोर सोडून मुंबई चित्रपटसृष्टीत आणि कोलकाता चित्रपटसृष्टीत स्थायिक होतात. त्यामुळे 'हिरामंडी'तील बाजारचा त्यांचा प्रवास तसाच असेल, त्यांना गाणे आणि नाचायचे आहे, पण यावेळी त्या 'नवाबां'साठी नाही, तर निर्मात्यांसाठी नाचताना दिसतील. अशा प्रकारे आम्ही दुसरा सीझन प्लान करत आहोत."