आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 12:42 IST2025-09-29T12:41:27+5:302025-09-29T12:42:06+5:30
समीर वानखेडेंनी 'त्या' सीनवरुन घेतला आक्षेप, कोण आहे हा अभिनेता?

आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
आर्यन खानचीवेबसीरिज 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. सीरिजमधील दिग्गज अभिनेत्यांचे कॅमिओ, सीरिजचा क्लायमॅक्स, कलाकारांचा अभिनय, तसंच काही सीन्समुळे निर्माण होणारे वाद यामुळे सीरिज रिलीज झाल्यापासूनच लक्ष केंद्रित करत आहे. सीरिजमध्ये एक सरकारी अधिकारीही दाखवला आहे जो अंमली पदार्थ विरोधी खात्यात आहे. त्याचं कॅरेक्टर अगदी रिअल लाईफ समीर वानखेडेंसारखंच घेण्यात आलं आहे. आर्यन खानला २०२१ साली समीर वानखेडेंनीच ताब्यात घेतलं होतं. तशीच घटना आर्यनने मजेशीर अंदाजात सीरिजमध्ये दाखवली. यावरुन समीर वानखेडेंनी तक्रारही केली. सीरिजमध्ये त्या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका नक्की कोणी केली?
बॅड्स ऑफ बॉलिवूडमध्ये ती भूमिका साकारणारा अभिनेता आहे आशिष कुमार. ही त्याची पहिलीच भूमिका आहे. सीरिजमधील कास्ट लिस्टमध्ये त्याचं नाव प्लेन क्लोथ कॉप असंच दिलं होतं. आशिष सोशल मीडियावरही फारसा सक्रीय नसतो. सीरिजनिमित्ताने त्याने नुकताच व्हिडिओ शेअर करत सर्व सीरिजच्या चाहत्यांशी संवाद साधला. तो म्हणाला, "बॅड्स ऑफ बॉलिवूडमध्ये जी कॉपची भूमिका आहे ती मी केली आहे. मी रेड चिलीज, कास्टिंग डायरेक्टर्स आणि तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो. आर्यनशी माझी चर्चा फक्त सीनपुरतीच झाली. बाकी काही नाही. दिग्दर्शकाचं जे व्हिजन होतं ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला."
तो पुढे म्हणाला, "अनेक लोक मला म्हणत आहेत की माझे फॉलोअर्स खूप कमी आहेत. मी फारसं सोशल मिडिया वापरत नाही पण आता नक्की वापरेन. अनेकांनी विचारलं की सीरिजमधला कॉप मीच आहे का? तर हो मीच आहे. तो लूकच तसा होता. माझा लूक कोणासारखा तरी आहे वगैरे हे सगळं लोक म्हणत आहेत त्यात मला पडायचं नाही. खऱ्या आयुष्यात हा मी आहे. ते तर मी पडद्यावर फक्त ती भूमिका आहे. मला कसल्याही प्रकारची चीप पब्लिसिटी आवडत नाही. माझ्यासाठी ती भूमिका कायमच प्लेन क्लॉश कॉप हीच असेल. मला ती अशीच सांगण्यात आली होती. मला माझी वेगळी ओळख बनवायची आहे. असंच प्रेम करत राहा."