WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 09:04 IST2025-05-04T08:55:39+5:302025-05-04T09:04:01+5:30
भारताच्या संस्कृतीबद्दल काय म्हणाला सैफ अली खान?

WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
मुंबईत चार दिवस WAVES परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदते मनोरंजनविश्वातील दिग्गज आपले अनुभव सांगत आहेत. तसंच सध्याच्या काळात इंडस्ट्रीची वाढ होण्यासाठी काय करणं गरजेचं आहे याविषयी मतही व्यक्त करत आहेत. काल या परिषदेत नेटफ्लिक्सचे सह-सीईओ टेड सारंडोस यांचीही उपस्थिती होती. अभिनेता सैफ अली खानने (Saif Ali Khan) मंचावर त्यांच्यासोबत चर्चा केली.
WAVES SUMMIT च्या तिसऱ्या दिवशी सैफ अली खानने नेटफ्लिक्सचे सह-सीईओ टेड सारंडोससोबत बातचीत केली. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म कलाकारांसाठी नवीन संधी घेऊन येत असल्याचं मत त्याने व्यक्त केलं. तो म्हणाला, "मला इतरांची संस्कृती दर्शवणारे चित्रपट खूप आवडतात. जसं की जपानी सिनेमा. मात्र जर सर्वात जास्त आवडणारी गोष्ट कोणती असेल तर माझ्यासाठी 'महाभारत' ही सर्वात महान कथा आहे. ही आतापर्यंतची सगळ्यात प्रभावशाली महागाथांमधली एक आहे. मला सिनेमांमध्ये ही गाता पाहायची आहे. मोठ्या स्केलवरील युद्ध जे इतिहास रचेल."
सैफ पुढे म्हणाला, "मला रामायण, महाभारताप्रमाणेच आणखीही अनेक कथा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर बघायला आवडतील. लांबलचक असणाऱ्या गोष्टी ओटीटी प्लॅटफॉर्म्ससाठी सर्वात चांगल्या आहेत." पुढे नेटफ्लिक्सचं कौतुक करत तो म्हणाला, "जेव्हा कोणतंही काम नेटफ्लिक्सवर येतं तेव्हा ते जगभरात पोहोचतं. माझ्या सिनेमांसाठी कदाटित कोणी फोन करणार नाही पण नेटफ्लिक्सवरील शो पाहून अनेकांचे मला फोन आले आहेत. युरोप आणि अमेरिकेतील लोक मला सांगतात की आम्ही तुमचा हा शो पाहिला. आमची तुलना जगभरातील कलाकारांसोबत होते हे खूपच रोमांचक आहे. "
यानंतर नेटफ्लिक्सचे सहसीईओ टेड सारंडोस म्हणाले,"गोष्टी सांगायचं काम कोणत्या दिशेने जाईल याचा अंदाज लावणं कठीण आहे. मात्र जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचं हाच आमचा उद्देश राहिला आहे. कोव्हिडनंतर भारतातून २ बिलियन डॉलरची गुंतवणूक झाली जे देशात कंटेंट क्रिएशन आणि त्याचा आनंद घेण्यासाठी होत असलेल्या वेगवान बदलाचे स्पष्ट संकेत आहेत."