"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 17:57 IST2025-05-14T17:49:22+5:302025-05-14T17:57:25+5:30
ज्येष्ठ मराठी अभिनेते आणि लक्ष्मीकांत बेर्डेंचे सहकलाकार चेतन दळवींनी लक्ष्याविषयीची भावुक आठवण सर्वांसोबत शेअर केली.

"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी (laxmikant berde) काही वर्षांपूर्वी जगाचा निरोप घेतला. लक्ष्मीकांत बेर्डेंना सर्वजण लाडाने लक्ष्या म्हणतात. लक्ष्याच्या अनेक सिनेमांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. 'अशी ही बनवाबनवी', 'हमाल दे धमाल', 'शुभबोल नाऱ्या', 'पछाडलेला' अशा अनेक सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. लक्ष्याची कमी आजही मराठी मनोरंजन विश्वाला जाणवते. अशातच लक्ष्याचे सहकलाकार आणि ज्येष्ठ अभिनेते चेतन दळवींनी लक्ष्याविषयी भावुक किस्सा सर्वांना सांगितला आहे.
चेतन दळवींनी सांगितला लक्ष्याचा भावुक किस्सा
फिल्मी मराठीला दिलेल्या मुलाखतीत चेतन दळवींनी लक्ष्मीकांत बेर्डेंविषयीचा भावुक किस्सा सांगितला. चेतन आणि लक्ष्या यांनी अनेक मराठी सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. चेतन यांनी मुलाखतीत सांगितलं की, "लक्ष्याबरोबर कोणतीही भूमिका असो, मी करायला तयार आहे. लक्ष्या जायच्या आधी मी त्याला भेटायला गेलो. 'काय रे, कसा आहेस?' अशी मी लक्ष्याची विचारपूस केली. लक्ष्या मला म्हणाला, 'तुम्ही दोघंच माझे.' त्यावेळी त्याने माझं आणि विजय चव्हाणचं नाव घेतलं. 'तुम्ही दोघंच, बाकी कोण नाही माझं.' असं लक्ष्या मला म्हणाला. मी लक्ष्याला म्हटलं, 'वेडा आहेस तू. आधी सांगायचं ना आम्हाला, काय होतंय ते! त्याने स्वतःचे फार हाल करुन घेतले होते."
चेतन दळवी आणि लक्ष्या यांनी एकत्र अनेक नाटकांमध्ये काम केलं. 'टूरटूर' नाटकात चेतन आणि लक्ष्याने साकारलेली भूमिका प्रचंड गाजली. त्यानंतर 'हमाल दे धमाल', 'फेका फेकी' अशा सिनेमांमध्ये दोघांनी काम केलं. चेतन आणि लक्ष्या यांची विनोदी जुगलबंदी रंगभूमी आणि सिनेमांमध्ये प्रचंड गाजली. आजही चेतन त्यांचा खास मित्र आणि सहकलाकार लक्ष्याची आठवण काढतात.