Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 06:08 IST2025-08-19T06:07:16+5:302025-08-19T06:08:45+5:30
Achyut Potdar Passes Away: वयाच्या ९०व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला

Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
Achyut Potdar Death: ठाणे: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचं सोमवारी रात्री १० वाजून १० मिनिटांनी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. वयाच्या ९०व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीने एक बहुआयामी कलाकार गमावला आहे. अच्युत पोतदार यांनी आपल्या अभिनयाने आणि साध्या-सोप्या राहणीमानानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते.
अच्युत पोतदार यांचा जन्म २२ ऑगस्ट १९३४ रोजी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे एका मराठी कुटुंबात झाला. त्यांचे बालपण इंदूर येथे गेले. १९६१ मध्ये त्यांनी अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर त्यांनी मध्य प्रदेशातील रीवा येथे प्राध्यापक म्हणून काम केले. १९६२ ते १९६७ या काळात भारतीय सैन्यात कॅप्टन म्हणून सेवा बजावली. त्यानंतर त्यांनी इंडियन ऑइलमध्ये २५ वर्षे कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आणि १९९२ मध्ये वयाच्या ५८व्या वर्षी निवृत्त झाले.
चित्रपटसृष्टीतील प्रवास
अच्युत पोतदार यांनी वयाच्या ४४व्या वर्षी १९८० मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. एक छंद म्हणून त्यांनी अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. त्यांना ज्या भूमिका मिळाल्या त्या त्यांनी पूर्ण समर्पणाने साकारल्या. त्यांनी १२५ हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले, तसेच मराठी चित्रपट आणि नाटकांमध्येही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. याशिवाय त्यांनी ९५ टेलिव्हिजन मालिका, २६ नाटके आणि ४५ जाहिरातींमध्ये काम केले. त्यांच्या उल्लेखनीय हिंदी चित्रपटांमध्ये अर्ध सत्य (१९८३), परिंदा (१९८९), रंगीला (१९९५), दामिनी (१९९३), ३ इडियट्स (२००९), फरारी की सवारी (२०१२) आणि दबंग २ (२०१२) यांचा समावेश आहे. मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी नवरी मिळे नवर्याला (१९८४) आणि ये रे ये रे पैसा (२०१८) यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली. विशेषतः दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांच्या चित्रपटांमध्ये त्यांचा नेहमीच समावेश असे. त्यांनी अनेकदा वडील, प्राध्यापक, किंवा गंभीर व्यक्तिरेखा साकारल्या, ज्यामुळे त्यांना प्रेक्षकांमध्ये विशेष ओळख मिळाली.
टेलिव्हिजनवरही त्यांनी प्रधानमंत्री (एबीपी न्यूज), आंदोलन (आज तक), अमिता का अमित (सोनी) आणि माझा होशील ना (झी मराठी) यांसारख्या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. त्यांच्या माझा होशील ना या मालिकेतील 'अप्पा' ही भूमिका प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरली. अच्युत पोतदार यांच्या अभिनय कारकिर्दीला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. १६ ऑगस्ट २०१५ रोजी इंदूर येथील सानंद या सांस्कृतिक गटाने त्यांना लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार प्रदान केला. तसेच २०२१ मध्ये झी मराठी जीवन गौरव पुरस्कार त्यांना माझा होशील ना या मालिकेतील 'अप्पा' या भूमिकेसाठी मिळाला. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीने एक कसलेला अभिनेता आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व गमावले आहे.